

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीने बाधित शेतकर्यांना नगर जिल्ह्यातील शेतकर्यांना ढबू न मिळाल्याने संतप्त झालेल्या आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शासनाला चांगलेच फैलावर घेतले. राज्यातील शिंदे-फडणवीस शासनाने हजारो कोटी रुपयांच्या आकड्यांचा खेळ खेळण्या ऐवजी शेतकर्यांसह जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन आमदार तनपुरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केले.
आमदार तनपुरे यांनी राज्य शासनाकडून प्रकट केलेल्या अर्थसंकल्पाला स्वप्नरंजन अर्थसंकल्प असे संबोधत विधानभवनामध्ये शेतकर्यांसह जनसामन्यांचे प्रश्न मांडले. आ. तनपुरे यांनी सांगितले की, पीक विम्याबाबत शेतकर्यांच्या प्रश्नांकडे शासनाने दुर्लक्ष केले. विमा हप्ता अधिक तर नुकसान भरपाई कमी हीच योजना सद्यस्थितीला कार्यान्वित आहे. पीक विम्याबाबत शेतकर्यांची भावना वर्षानुवर्षे बदलत चालली आहे. पंतप्रधान पीक विम्याची व्याप्ती वाढत असल्याची खोटी माहिती जाहिरातीद्वारे दिली जात आहे.
7 लाख 35 हजार शेतकर्यांच्या आकड्यांवरून 2 लाख 40 हजार शेतकर्यांची आकडेवारी कमी झाली आहे. केंद्र व राज्य शासनासह शेतकर्यांनी भरलेला पीक विमा कंपन्यांना थेट मिळतो. सन 2020-21 साली 273 कोटी रुपये विमा हप्ता गोळा करून वाटप केवळ 2 कोटी 84 लाखाची नुकसान वाटप केली. 2022-23 या वर्षी नगर जिल्ह्यात 274 कोटी रुपये विमा हफ्ता मिळाल्यानंतर शेतकर्यांना केवळ 42 कोटी रुपये वाटप करून शेकडो कोटी रुपयांची वसुली केवळ नगर जिल्ह्यातून करण्यात आली.
केवळ विमा कंपन्यांचे भले करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा कंपनी कार्यान्वित असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. जिल्ह्यात केवळ दोन कर्मचार्यांवर पीक विमा कंपन्यांचे कामकाज चालते. लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना सातशे, हजार, अकराशे रुपयांचे नुकसानीबद्दल धनादेश अदा करणार्या पीक विमा कंपन्या शेतकर्यांची फसवणूक करीत आहेत.
राहुरी परिसरातील शेतकर्यांची कैफियत जाणून घेतल्यानंतर कृषी विभागाकडे गेलो. पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाईचा फॉर्म भरून घेताना नुकसान 80 टक्के दर्शविली तर कंपनीच्या संगणकामध्ये केवळ 20 टक्के नुकसान दाखविण्याचा प्रकार उघडकीस आला. शेतकर्यांच्या फसवणुकीबद्दल थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होऊन अनेक महिने उलटत आले तरी शासनाने दखल घेतली नाही. याची चौकशी करावी, अशी मागणी आ. तनपुरे यांनी केली.
शेतकर्यांना नुकसान भरपाई द्या
राज्यातील शिंदे-फडणवीस शासन गतीमान शासन असल्याचे सांगत कोटीचे कोटी आकडे दिल्याचे सांगत जाहिरातबाजी करीत आहे. नगर जिल्ह्यातील शेतकर्यांना दिवाळी सणाला अतिवृष्टी बाधित शेतकर्यांना एक पैसाही मिळाला नाही. अवकाळी पाऊस झाला तरी नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश दिले नाही. शासनाने नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकर्यांना निधी देण्याची मागणी आमदार तनपुरे यांनी केली.