

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : शहरात नवीन अकोले रोडवरील दुनियादारी कलेक्शन आणि स्पोर्ट्स या कापड दुकानास गुरूवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. दुकानातील महागडे कपडे, फर्निचरसह इलेक्ट्रीक साहित्य भस्मसात झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामक दल वेळीच दाखल झाल्यामुळे पाण्याचा मारा करुन, आग आटोक्यात आणल्याने मोठी हाणी टळली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल वर्पे यांच्या मालकीचे अकोले रोडवर बीएड कॉलेजजवळ दुनियादारी कलेक्शन अॅन्ड स्पोर्ट्स नावाचे कापड दुकान आहे. गुरुवारी सकाळी दुकान बंद असताना अचानक धूर निघू लागला.
हळू-हळू दुकानातील सर्व कपडे पेटले. दुकानामध्ये आग धूमसत गेल्यामुळे आगीच्या मोठ्या ज्वाला निघत होत्या. दुकानाला आग लागल्याचे समजतात मालक राहून वर्पे यांनी घटनास्थळी धाव घेत दुकानाचे शटर उघडले. या आगीमध्ये कपडे, फर्निचर व छताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग विझविण्यासाठी मारलेल्या पाण्यामुळे कपडे ओले होऊन खराब झाले. आगविजेच्या शॉर्टसर्किटने लागल्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तविण्यात येत आहे. दुकानदारास मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे.