अहमदनगर : कर्डिले-तनपुरेंमध्ये पुन्हा संघर्ष; राहुरी कारखाना चालविण्यास देण्यावरून वाद

अहमदनगर : कर्डिले-तनपुरेंमध्ये पुन्हा संघर्ष; राहुरी कारखाना चालविण्यास देण्यावरून वाद

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बँकेने 160 कोटींच्या कर्जवसुलीसाठी ताब्यात घेतलेला राहुरीचा डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना चालवायला देण्यावरून जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले व राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्यात पुन्हा संघर्ष सुरू झाल्याचे सूत्रांकडून समजते. कर्डिले यांनी हा कारखाना चालवायला देण्यासाठी पुढाकार घेतला, तर अरुण तनपुरेंनी लेखी हरकत नोंदवत त्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे 16 सप्टेंबर रोजी होणार्‍या बोर्ड मिटिंगमध्ये या विषयावर काय निर्णय होणार, याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

डॉ. तनपुरे कारखान्यावर सध्या प्रशासक आहे. संचालक मंडळाची मुदत मागेच संपली आहे. निवडणूक घेण्यासाठी 30 ते 35 लाख रुपये शासन तिजोरीत भरण्याची गरज आहे. परंतु प्रशासकांनी ही रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. दरम्यान, 29 ऑगस्टच्या जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीत 160 कोटींच्या कर्जवसुलीकरिता हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देण्याचा निर्णय झाला.

निविदा प्रक्रिया राबवून, कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवताना, बँकेच्या अटी व नियमांमध्ये पात्र संस्थेलाच तो देण्याचे ठरले. मात्र कर्डिले यांनी मांडलेल्या या भूमिकेला बँकेचे संचालक असलेल्या अरुण तनपुरे यांनी याच बैठकीत हरकत घेतली. नंतर नुकतेच त्यांनी बँक व्यवस्थापनाला पत्र देऊन कारखान्याची निवडणूक घ्यावी, नंतरच याबाबत निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली आणि कारखाना चालवायला देण्यास तीव्र विरोध दर्शवला.

आधी निवडणुका घ्या : तनपुरे

डॉ. तनपुरे कारखाना हा 22 हजार सभासदांच्या मालकीचा आहे. तो एखाद्याला 15 वर्षे चालवायला दिला, तर त्याचे परिणाम सभासदांना भोगावे लागतील. त्यामुळेच तो सभासदांनीच चालवावा, अशी आमची भावना आहे. त्यासाठी आधी निवडणुका होऊन जाऊ द्या. त्याचा निकाल आल्यानंतर बँकेतून काय तो निर्णय घेतला जावा. निवडणुकांसाठी प्रशासकांनी पैसे उपलब्ध करणे आवश्यक आहे, अशी भूमिका अरुण तनपुरे यांनी 'पुढारी'कडे मांडली.

निवडणुका हव्यात, तर पैसेही भरा : कर्डिले

मी बँकेचा चेअरमन आहे. शेतकरी, कामगारांसाठी काहीतरी केले पाहिजे, या हेतूने राजकारण बाजूला ठेवून कारखाना चालवायला देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अरुण तनपुरे यांनी विरोध केला. निवडणूक होईपर्यंत हा कारखाना चालवायला देऊ नका, अशी त्यांची लेखी मागणी आहे. मात्र कारखान्याकडे निवडणूक घेण्यासाठी पैसे नाहीत. प्रशासकांनी तसे लेखी कळविले आहे. मात्र तनपुरेंना जर निवडणूक हवी आहे, तर त्यांनी ही रक्कम भरून खुशाल निवडणूक लावावी. 16 तारखेला बोर्ड ठरवेल काय करायचे ते, अशी भूमिका शिवाजी कर्डिले यांनी 'पुढारी'कडे मांडली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news