

नगर : अतिपावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील प्रमुख रस्त्यांची पिचिंग केली होती. मात्र, अतिपावसामुळे त्या रस्त्यावरील डांबर वाहून गेले आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यात केडगाव, नागापूर, बोल्हेगाव, मुकुंदनगर आदी भागात रस्त्याचे कामे रखडली होती. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान, नाविण्यापूर्ण योजना अनुदान, मूलभूत सुविधा विकास योजना, पर्यटनासाठी पायाभूत सुविधा पुरविणे, खासदार निधी, आमदार निधी, 12, 13, 14, 15 वित्त आयोग, अल्पसंख्याक बहुक्षेत्र विकास निधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना, विकास भार निधीतून खर्च, रेखांकन अंतर्गत सुधारणा, अ. बांधकाम परवानगी अंतर्गत सुधारणा, अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशा कपोटी प्रिमियम रक्कमेतून कामे करणे, रस्ते दुरूस्ती, रस्ते खोदाई शुल्कमधून रस्त्याची कामे व दुरूस्ती, इमारत दुरूस्ती, गटार व ड्रेनेज दुरूस्ती, नवीन रस्ते विकसित करणे आदी योजनांतर्गत शहरात 333 कामे मंजूर आहेत. त्यातील 75 कामे पूर्ण झाली आहेत. तर, 185 कामे प्रगतिपथावर आहेत. मागील वर्षाचे 142 कामे प्रलंबित आहेत.
पावसाळा संपल्याने रखडलेली रस्त्याची व अन्य कामे सुरू केली आहेत. सध्या 185 कामे प्रगतिपथावर आहेत. तर, 196 कामांचा कार्यारंभ आदेश झालेला आहे. सर्वच कामे वेळेत पूर्ण करण्यावर बांधकाम विभागाचा भर आहे.
– सुरेश इथापे, प्रभारी शहर अभियंता, मनपा
शहरासाठी 5 कोटींचा आमदार निधी
आमदार निधीतून शहरासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्या निधीतून 25 कामांना मंजुरी देण्यात आली आहे. आठ कामे पूर्ण झाली असून, 23 कामे प्रगतिपथावर आहेत. तर, 16 कामांचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.
मूलभूतची कामे रखडली
शहरात शासनाच्या मूलभूत विकास योजनेतून शहरातील पाच रस्त्यांची कामे मंजूर झाली होती. मात्र, त्या कामांची निविदा प्रक्रियेसह सर्व जबाबदारी शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली. बांधकाम विभागाने निविदा प्रसिद्ध केली. ठेकेदाराने निविदा भरली. परंतु, संबंधित ठेकेदाराने कामे केली नाहीत. महापालिकेने वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची कामे केली नाही. सुमारे 31 कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खासदार निधीतून दोन कोटी
आर्थिक वर्षे 2022-23 मध्ये नगर शहरासाठी दोन कोटी रुपयांचा खासदार निधी प्राप्त झाला आहे. त्यातून अवघे काम काम झाले असून, ते काम पूर्ण झाले असल्याची नोंद मनपाच्या अहलवात आहे.