नगर : पोलिसांविरोधात नागरिकांचा मूकमोर्चा

नगर : पोलिसांविरोधात नागरिकांचा मूकमोर्चा

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : शहरात दोन दिवसापूर्वी दोन गटांत मारामारीची घटना घडली. त्याचे शहरात तीव्र पडसाद उमटले. या मारहाणीच्या निषेधार्थ व श्रीगोंदा पोलिसांच्या अकार्यक्षमतेच्या विरोधात शुक्रवारी (दि.27) सर्व पक्षीय नेत्यांसह नागरिकांनी श्रीगोंदा शहरातून मूकमोर्चा काढला. दरम्यान, काल पुकारण्यात आलेल्या 'बंद'ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रीगोंदा बसस्थानक परिसरातून मोर्चा सुरू झाला. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात निषेध सभा घेण्यात आली. सर्वपक्षीय नेत्यांनी दिलेल्या शहर बंदच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देत शुक्रवारी दिवसभर शहर बंद करीत या घटनेचा निषेध केला. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार, बाळासाहेब नाहटा, मनोहर पोटे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

यावेळी आमदार पाचपुते यांनी घडलेली घटना लाजीरवाणी असून, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता, तर शहराला काळीमा फासणारी घटना घडली नसती. या घटनेमुळे पोलिसांची निष्क्रियता समोर आली असून, आचारसंहिता संपल्यानंतर पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांची उचलबांगडी करणार असल्याचे स्पष्ट केले.  माजी आमदार जगताप यांनी शहरात, तसेच तालुक्यात सुरू असलेले अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. मटका, जुगार, त्याचबरोबर इतर अवैध धंद्याची पोलिसांना खडान्खडा माहिती असूनही त्यांच्यावर कारवाई का होत नाही?

गेल्या काही दिवसात एवढ्या गंभीर घटना घडून, श्रीगोंदा पोलिस काहीच कारवाई करणार नसतील, तर जनता वेगळे पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण आर्थिक मदत करण्यास तयार असल्याचे यावेळी सांगितले. भोस म्हणाले, श्रीगोंदा शहरासह तालुक्यात कोणाचेही गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. कुणी गैरप्रकार करत असेल तर त्यांना कुणी खतपाणी घालू नये.

घनश्याम शेलार यांनी शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यात संबंध असलेल्यांची बदली नाही, तर त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी केली.
टिळक भोस म्हणाले, आजचा हा मोर्चा हा कुणा एका व्यक्तीविरोधात नसून, हा दहशत माजवणार्‍या व्यक्तींच्या विरोधात आहे. श्रीगोंद्यासारख्या शहरात कुणी दादागिरी करणार असेल, तर त्याचा आम्ही नक्कीच बिमोड करू. पोलिस ठाण्याच्या आवारात मारहाण होत असताना पोलिस बघ्याची भूमिका घेणार असतील, तर त्यांच्या हातून कायद्याचे रक्षण होणार आहे का? असा प्रश्न पडतो.
यावेळी राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, बापू गोरे, गोपाळराव मोटे, संतोष इथापे, सुनील वाळके यांनी भाषणे झाली.

पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या बदलीची एकमुखी मागणी करीत 10 फेब्रुवारीपर्यत बदली न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान, मोर्चा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पोलिस उपअधीक्षक तळ ठोकून
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव दिवसभर पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते. त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेत याबाबतची माहिती वरिष्ठांना कळवली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news