नगरमध्ये काँग्रेसचं हनुमान चालिसा पठण

नगरमध्ये काँग्रेसचं हनुमान चालिसा पठण
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्त्तसेवा : शहरात काल कॉँग्रसने अनोखे आंदोलन केले. भाजपचे हिंदू प्रेम बेगडी आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी द्वेष पसरवला जात आहे. केंद्रासह राज्यात भाजप सरकार असून देखील देशातील हिंदू असुरक्षित आहेत. हे प्रभू श्रीराम, बजरंग बली, भाजप अंध भक्तांना सद्बुद्धी दे. हिंदूंवरील अन्याय थांबू दे, बजरंग दलाने काँग्रेस निषेधाचे शहरात आंदोलन केले, त्याला युवक काँग्रेसने अशाप्रकारे जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान, नगर शहर युवक काँग्रेसच्या हिंदू कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा पठण करत महागाई, बेरोजगारीमुळे हिंदूंसह सर्व धर्मीय देशवासीयांवर सुरू असणार्‍या अन्यायाविरोधात भाजप सरकारचा निषेध केला.

यावेळी बजरंग बली की जय, जय श्रीराम, भारतीय धर्मनिरपेक्ष संविधानाचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. युवक अध्यक्ष प्रवीण गीते म्हणाले की, ढोंगी हिंदुत्ववादी भाजप सरकारमुळे देशातील तमाम हिंदूंवर अन्याय सुरू आहे. पेट्रोल, डिझेलची सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारी दरवाढ झाली आहे. गगनाला भिडलेल्या गॅसच्या किमती, महागाईमुळे हिंदूंना जगणे मुश्किल झाले आहे. हिंदू व्यापार्‍यांना जीएसटीच्या जाचातून मुक्त करावे. हिंदूंकडून टॅक्स आकारणी रद्द करावी. युवक उपाध्यक्ष आकाश आल्हाट म्हणाले, काँग्रेस सरकार असताना हिंदूंसह सर्व धर्मीय सुरक्षित होते.

मात्र आज हिंदू असुरक्षित आहेत. सरकार खरे हिंदुत्ववादी असेल तर त्यांनी तत्काळ आमच्या हिंदू बांधवांसाठी पेट्रोल पन्नास रुपये, डिझेल चाळीस रुपये, गॅस शंभर रुपये दराने द्यावे. प्रत्येक हिंदू तरुणाला तत्काळ सरकारी नोकरी द्यावी. हिंदू तरुणांना ढोंगी हिंदुत्ववादी सरकारने बेरोजगारीच्या खाईत लोटल्याने तरुण नैराश्यग्रस्त झाला आहे. रोजगार देण्याऐवजी हनुमान चालीसा पठण करायला लावत हिंदू तरुणांना कायम गरीब, बेरोजगार ठेवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येवून महागाई विरोधात तसेच भाजपाच्या चुकीच्या धोरणांविरोधात केलेले हनुमान चालिसा पठणाचे अनोखे आंदोलन दिवसभर चर्चेचा विषय बनले होते. या आंदोलनात युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news