

शेवगाव (नगर), पुढारी वृत्तसेवा: खासगीकरणाच्या विरोधात महावितरण आणि इतर संबंधीत कंपन्याचे अधिकारी व कर्मचारी संपावर गेल्याने शेवगाव तालुक्यात वीज टप्याटप्याने गुल झाली आहे. वीजेअभावी मोबाईल सेवा ठप्प होऊ लागली असुन अनेकांचा संपर्क तुटला आहे. तसेच व्यवसायांवरही विजेचा विपरीत परिणाम झाला आहे.
बुधवारी पहाटेपासून शहरासह काही भागात विज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर दुपारपर्यंत बहुतांशी भागातील बत्ती गुल झाली. यामुळे अनेकांचे मोबाईल डिसचार्ज झाल्याने संपर्क तुटला आहे. तर व्यवसायांवरही विजेचा परिणाम झाला असुन व्यवहार ठप्प होत चालले आहेत.
विजेशी निगडीत घरासह व्यापारी, दुकानदार हॉटेल यांची सर्व विद्युत उपकरणे बंद झाली आहेत. त्यामुळे हळू हळू हे व्यवसाय तात्पुरते बंद होण्याच्या मार्गावर आहेत. रात्री वीज नसेल, तर काय असा प्रश्न सर्वांसमोर ठाकला गेला आहे. काळोख रात्रीत चोरांची भिती निर्माण झाली आहे. दिवा बत्तीस केरोसिन नसल्याने मेणबत्तीचा वापर होणार आहे. वीज हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. वीजेशिवाय अनेक उलाढाली, संपर्क करणे ठप्प होणार असल्याने शासनाने जलद गतीने यावर तोडगा काढणे उचित ठरणार आहे.