

नगर; पुढारी वृत्तसेवा : महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी स्थायी समितीकडे 1240 कोटींचा अंदाजित अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावर स्थायी समितीमध्ये दोन दिवस चर्चा झाली. त्या चर्चेअंती स्थायी समितीने त्या 147 कोटींची भर घातली. स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी आज महापौर रोहिणी शेंडगे यांच्याकडे वाढीव शिफारशीसह 1387 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान सभापती कवडे यांनी महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी करबुडव्यांवर नजर केंद्रीत करत त्यांना कराच्या जाळ्यात ओढण्याच्या दृष्टीने शिफारसी केल्या आहेत.
सदस्यांनी त्यावर अभ्यासासाठी वेळ मागितला असून, 28 मार्च रोजी त्यावर चर्चा होणार आहे. महापालिकेची अर्थसंकल्पीय महासभा महापौर शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसचिव एस. बी. तडवी उपस्थित होते.
सभापती कवडे म्हणाले, आयुक्तांनी 1240 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. स्थायी समितीने त्यात गरजेनुसार सुधारणा करून अर्थसंकल्प लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला आहे. मनपाची आर्थिक परिस्थिती पाहता उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. आर्थिक उत्पन्नाचा मेळ घालून स्थायी समितीने 1387 कोटी 79 लाखांचा अर्थसंकल्प तयार केला आहे. नवीन घरांना घरपट्टी लागू करणे, ज्या मालमत्ताधारकांची नोंदणी अद्यापि मनपाकडे झाली नाही, त्यांचा सर्व्हे करून नोंदणी करणे.
पत्राशेड धारकांकडून घरपट्टी आकारणे, गाळा भाडे, जाहिरात बोर्ड, अनधिकृत बांधकाम नियमित करून कर वसूल करणे, पे अॅण्ड पार्किंगची व्यवस्था करणे, अनधिकृत नळ कनेक्शन कायम करणे, बंद शाळा खासगी तत्त्वावर चांगल्या शैक्षणिक संस्थेला देणे, आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. पाणी पुरवठा फेज 2 योजना व केंद्र शासनाची अमृत योजना अंतिम टप्प्यात आली असून, योजना लवकरच मार्गी लागणार आहे. त्यामुळे पुढील 50 वर्षांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असून, शहराला पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे.
अमृत भुयारी गटार योजनेला गती देऊन लवकर पूर्ण केली जाईल. त्यानंतर अमृत भुयारी गटार योजनेच्या दुसर्या टप्प्याचे काम केले जाणार आहे. शहराचे नाट्य संकुलही पूर्णत्वाकडे जात आहे. दरम्यान, सभापतींच्या मनोगतानंतर ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे म्हणाले, सभापतींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर दोन ते तीन दिवस अभ्यास करण्यासाठी कालावधी मिळावा. त्यानंतर महापौरांनी सभा तहकूब करून 29 मार्चला चर्चेसाठी सभा ठेवली आहे.
तरुणांना रोजगार मिळणार
प्रोफेसर कॉलनी चौकात शॉपिंग मॉल उभारणे, सावेडी गावठाण येथे शॉपिंग सेंटर, गंजबाजारातील भाजी मार्केट व अद्ययावत सुवर्णपेढी उभारणे, टीडीआरच्या माध्यमातून मोक्याच्या जागा विकसित करणे, त्यासाठी बँककडून कर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे. उत्पन्न वाढीबरोबर शहरातील तरुणांना रोजगारही मिळणार असल्याचे सभापती कवडे यांनी सभेत सांगितले.