

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील शासकीय धान्याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत असून, हा काळाबाजार त्वरित बंद व्हावा, या मागणीसाठी बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे पाथर्डी तालुकाप्रमुख विष्णू ढाकणे यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. लवकरात लवकर कारवाईची मागणी केली आहे. ढाकणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, 4 नोव्हेंबर रोजी शासकीय धान्य पुरवठा गोडाऊनला भेट दिली. त्यावेळी गोडाऊनचा सावळा गोंधळ लक्षात आला. गोडाऊनच्या मागच्या बाजूला एक विटकरी रंगाच्या टेम्पोमध्ये शासकीय गहू व तांदूळ भरत असताना निदर्शनास आले.
त्यावेळी गोडाऊन किपर व काही हमाल आणि राजकीय मंडळी गोडाऊनमध्ये उपस्थित होते. गोडाऊन किपरला विचारणा केली असता, या खासगी गाडीत शासकीय माल कसा भरता, असे विचारले असता त्यांनी ही गाडी वाहातूक ठेकेदारांची असल्याचे सांगितले. त्यावेळी आम्ही त्यांना विचारले शासकीय धान्य वाहतूक करणार्या गाड्या एका विशिष्ट हिरव्या रंगाच्या असतात, त्या गाडीवर मागे आणि पुढे व दोन्ही बाजूंनी सुधारितद्वार वितरण योजना व महाराष्ट्र शासन, असे लिहिणे बंधनकारक आहे.
तुम्ही या खासगी गाडीत शासकीय माल कसा भरला, असे विचारले असता त्यांनी सांगितले ही गाडी वाहतूक ठेकेदारांची आहे. या गोष्टीवर आम्हास संशय बळावला, तरी पाथर्डी तालुक्यांत बेकायदेशीर खासगी गाड्या वापरून शासकीय धान्याची वाहतूक करून ठेकेदारामार्फत पाथर्डी तालुक्यात स्वस्त धान्य विक्रीचे रॅकेट सुरू आहे. शासकीय धान्याचा काळाबाजार सुरू आहे. शासकीय धान्याचा हा काळाबाजार कुणाच्या पाठिंब्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खुलेआम करत आहेत, याची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे.
बेकायदेशीर ठेकेदार व शासकीय अधिकारी या धान्य काळ्याबाजारात सामिल असतील त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करून करावे, अशी मागणी त्यांनी केली. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.