नगर : पुढारी वृत्तसेवा
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मंदिर व मशिदीवरील भोंग्यांना वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. आता रात्री दहानंतर वाढदिवसासह अन्य कार्यक्रमांतही भोंग्याचा आवाज नको, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. रात्रीच्या वेळी वाढदिवसाच्या कार्यक्रमात भोंगा वाजल्यास कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याविषयी भूमिका घेतल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. मशिदीवरील भोंगे वाजल्यास आम्ही हनुमान चालिसाचा नाम जप करू, असा इशारा दिला. त्यानंतर मंदिर व मशिदीवरील पहाटेचे भोंगे बंद झाले. तर, पहाटे सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत मंदिर व मशिदीवरील भोंग्यांना परवानगी दिली.
त्यातही आवाजाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी दहानंतर मंदिर व मशिदीवरील भोंग्यांचा आवाज बंद करण्यात आला आहे. दुसरीकडे विविध कार्यक्रमांना दहानंतर भोंगे लावले जात असल्याची तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. वाढदिवस व अन्य कौटुंबिक कार्यक्रमाचा समावेश आहे.
परंतु, रात्री वेळी भोंगे वाजविण्याला सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असताना, भोंगे वाजविले जात असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत. कारण, रात्रीच्या वेळी शहरातील उपनगरांमध्ये चौकात, कॉलनीमध्ये भोंगे वाजवून कार्यक्रम केले जातात. त्याचा नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे भर चौकात वाढदिवसासह अन्य कार्यक्रमात भोंगे वाजविणार्यांवर कारवाईचा बडगा उगरला जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, मंदिर व मशिदीवरील भोंग्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी 6 ते रात्री 10 ही वेळेची मर्यादा आहे. मंदिर व मशिद व्यवस्थापना रितसर पोलिस परवानगी घ्यावी लागत आहे. शहरात आतापर्यंत मंदिर 14 व मशिद 43 यांना भोंग्यांना परवानगी दिली आहे.
रात्री दहानंतर भोंगा वाजविण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी आहे. मात्र, तरीही वाढदिवस अथवा अन्य कार्यक्रमात भोंगा वाजविल्यास पोलिस कारवाई करणार आहेत.
– ज्योती गडकरी
पोलिस निरीक्षक, तोफखाना