Nagar : एसपींचे आदेश झुगारून बिंगो सुरूच !

Nagar : एसपींचे आदेश झुगारून बिंगो सुरूच !

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  पोलिस अधीक्षकांचे आदेश झुगारून पोलिसांनी बिंगो जुगार सुरूच ठेवला आहे. काळजी करू नका, सारे सुरळीत होईल, असा जुगार चालकांना आधार देत, पोलिस जनहिताला धोका देण्याचा प्रयत्न करीत आहेत. बिंगो जुगारापायी काही युवकांनी केलेल्या आत्महत्यांची पर्वा नाही, तरुण पिढी बरबाद होईल याची चिंता नाही. फक्त आणि फक्त यातून मिळणारा आर्थिक स्वार्थ बंद होऊ नये, एवढाच विचार करून जनहित रक्षण करणारे शेवगावचे पोलिस बिंगो जुगाराला संरक्षण देण्याचा प्रयत्न करतात. ही बाब आता संतापजनक झाली आहे. भिऊ नका, चालू ठेवा, असा आधार देत, तुम्ही कमवा आणि आम्हाला जपा, असा पोलिसांचा चालू असलेला कायदा अनेकांना जुगाराच्या आहारी जाण्यास भाग पाडणारा आहे.

हळूहळू शहरात गल्लोगल्ली चक्रीचा बिंगो जुगार आता पसरत चालला आहे. या फिरत्या चक्रीच्या नादाने अनेक युवक फिरस्ते झाले आहेत. पालकांना याची चिंता सतावत आहे. आज ना उद्या पोलिस याचा बंदोबस्त करतील, अशी अपेक्षा असताना, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू सोन्याच्या माळा, अशी ही हातमिळवणी तरूणांच्या व्यसनमुक्तीला बाधक ठरत आहे. 10 रूपयास 90, तर 100 रुपयांस 900 रुपये, असे आमिष दाखविणाराा हा जुगार अनेकांना आकर्षित करीत आहे. यात अनेक शालेय विद्यार्थी बळी पडत आहेत. पैशांची लालूच सुटत नाही अन् बघता बघता हजारो रूपये कंगाल होऊन नंतर पश्चाताप करतात. पुन्हा गेलेले पैसे मिळविण्याच्या अपेक्षेने या जुगारीच्या दारात जातात आणि पुन्हा तोटाच होतो.

यामुळे स्वतःच्याच घरी चोरी करणे, दारूच्या आहारी जाणे, अशा प्रकारे तरूण बिघडत चालले आहेत. जवळपास 15 ते 20 बिंगो जुगारातून दररोज कोटी रूपयांच्या आसपास उलाढाल होत आहे. पोलिस अधीक्षकांनी यापूर्वीच बिंगो जुगार बंद करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले आहेत. मात्र, त्याकडे कानाडोळा करून या जुगाराला पोलिसच आधार देत असल्याने, आता याबाबत पोलिस अधीक्षक काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

अवैध व्यवसाय बंद करा : वंचित आघाडी
लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने हे चालले आहे. पोलिस अधिकारी यातून मोठी माया जमा करतात. या जुगाराने सर्वसामान्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले तरी चालतील, अशीच त्यांची भूमिका दिसते. त्यामुळे सर्व अवैध व्यवसाय बंद करावेत, असे निवेदन दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांनी दिले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news