

साकुर : पुढारी वृत्तसेवा : दोन दिवस शेतकर्यांनी ऊसतोड करू नये, रस्त्यावरून ऊस वाहतूक करु नये. आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन संघटनेने करुनही संगमनेर तालुक्यात मांडवे बुद्रुक येथील लिंब फाट्यावर ऊस वाहतूक होत असल्याचे 'भूमिपुत्र' संघटना कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी उसाचे ट्रॅक्टर कारखान्याकडे जात असताना रोखले. यामुळे आंदोलनाला वेगळे वळण लागल्याचे वास्तव समोर येत आहे.
चालू गळीत हंगामात एक रकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी, गतवर्षीच्या उसाची एफ.आर.पी. अधिक 200 रुपये तातडीने जमा करावे, कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन करा, केंद्राने साखरेचा हमीभाव प्रति क्विंटल 3500 करावा अशा विविध मागण्यांसंदर्भात केंद्र व राज्य सरकारसह साखर कारखान्यांचे लक्ष वेधण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली (दि. 17 व 18) नोव्हेंबर रोजी दोन दिवस राज्यभर ऊस तोड व ऊस वाहतूक बंद आंदोलनाचा बडगा उगारला. दरम्यान, या आंदोलनाच्या दोन दिवसात उसाचे एकही टीपरू कारखान्याला जाऊ देणार नाही, असा एल्गार पुकारत ऊस वाहतूक व ऊस तोड बंद पाडण्याचा इशारा भूमिपूत्रचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी दिला.
आंदोलनाचा दूसरा दिवस होता. भूमिपुत्रच्या कार्यकर्त्यांनी पठार भागातील ज्या ठिकाणी ऊस तोड चालू आहे, तेथे थेट शेतात जाऊन ऊस तोड बंद पाडण्यास सुरुवात केली. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागण्या मान्य न केल्याने भूमिपूत्र संघटना आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी भूमिपुत्रचे अध्यक्ष संतोष वाडेकर, प्रदेश सचिव किरण वाबळे, संजय भोर, मंजाबापू वाडेकर, नवनाथ जाधव, संपत फटांगरे, उल्हास दरेकर, संकेत भोर, संदीप जाधव, विलास गागरे आदी उपस्थित होतेे.