

वांबोरी : पुढारी वृत्तसेवा : आठवडे बाजाराच्या दिवशी असलेल्या सभेत मिरचीचा ठसका लागतो, हे मी समजू शकतो, परंतु पाणी योजना कामाच्या भूमिपुजनाच्या एखाद्यास मिरच्या झोंबतात, हे फक्त वांबोरीतच पहायला मिळाले, असा उपरोधिक टोला विरोधकांना मारत आ. धनंजय मुंडे म्हणाले, या भागाचा प्रतिनिधी होण्यासाठी आ. प्राजक्त तनपुरेंना सलग दहा वर्षे संघर्ष करावा लागला. संघर्षातून जनसेवेचा वारसा असलेले नेतृत्व घडते. तेव्हा जनतेच्या प्रति उपकाराची जाणीव मनामध्ये राहते. त्यामुळेच आ. तनपुरे यांनी आपल्याकडे असलेल्या विभागांमधून वांबोरी परीसराला 65 कोटी रुपये देऊन परिसराचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे आ. मुंडे यांनी सांगितले.
राहुरी तालुक्यातील बांबोरी येथे जीवन मिशन अंतर्गत वांबोरी पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन आ. मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. प्राजक्त तनपुरे होते. यावेळी माजीमंत्री आ. प्राजक्ता तनपुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेशशेठ बाफना, उपसरपंच मंदाबाई भिटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, वांबोरीचे माजी सरपंच नितीन बाफना, माजी सरपंच किसन जवरे, माजी सरपंच कृष्णा पटारे, ऋषिकेश मोरे, संगीता जवरे, ईश्वर कुसमुडे, संतोष कांबळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत नवले, किसनराव पागिरे, बाळासाहेब लटके, संदीप निकम, बाबासाहेब चौधरी आदी उपस्थित होते.
आ. मुंडे म्हणाले, जनतेने संधी तुम्हालाही दिली होती. तुम्ही परिसराचे दहा वर्षे नेतृत्व केले. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत तुमचीच सत्ता होती, तरीही तुम्हाला एका गावासाठी तीन कोटी रुपये सुद्धा देता आले नाही. जनतेच्या आशीर्वादामुळे आम्ही आमदार झालो. आम्ही आमच्या कातडीची जोडे करून जरी तुम्हाला घातली तरीही मरेपर्यंत तुमच्या उपकारातच राहू. खा. डॉ. सुजय विखेंचे नाव न घेता मुंडे यांनी त्यांच्यावर खास शैलीतून उपरोधक टीका केली. 'तुमची ऐपत मोठी असताना केवळ 40 कोटींच्या योजनेचे श्रेय घेऊ नका, तर अ.नगरसाठी एक -दोन हजार कोटींचा एखादा प्रकल्प आणा, आम्ही तुम्हाला खांद्यावर घेऊ,' असे ते म्हणाले.
दरम्यान, येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, त्यामुळे विकासाची चिंता तुम्ही करू नका, असे यावेळी त्यांनी सांगितले.
आ. तनपुरे म्हणाले की, जलजीवन मिशन अंतर्गत होणार्या पाईप लाईनमुळे वांबोरी परिसराला पाण्याच्या संकटापासून मुक्ती मिळणार आहे. लवकरात- लवकर अतिशय दजदार काम करून एक चांगली पाणी योजना वांबोरीकरांसाठी होणार आहे. त्याचबरोबर मिरी- तीसगाव पाणी योजनेसाठी स्वतंत्र 155 कोटी रुपयांची मंजूर आणली आहे. यामुळे मिरी- तिसगावसह परिसरातील गावांना त्याचा मोठा लाभ होणार आहे, असे ते म्हणाले.
सध्याच्या सरकारने सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या कामांवर स्थगिती आणली असून, टेंडर झालेली कामेही बंद केल्याची नाराजी व्यक्त केली. भिटे म्हणाले, जल जीवन योजनाही आ. प्राजक्ता तनपुरे यांनी विशेष प्रयत्नातून मंजूर केली असून महाविकास आघाडी सरकारचे काळातच या योजनेला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या योजनेचे श्रेय आ. प्राजक्त तनपुरे यांनाच असल्याचे ते म्हणाले.
आ. प्राजक्त तनुरेंची पेढेतुला
वांबोरीकरांसाठी दररोज शुद्ध व पूर्ण दाबाने पाणी देण्याचे वचन महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात वांबोरीकरांना दिले होते. त्याची वचनपूर्ती करण्यासाठी माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विशेष प्रयत्न करून, योजना मंजूर केली. त्यामुळे वांबोरी ग्रामस्थांच्या वतीने आ. तनपुरे यांची पेढे तुला करण्यात आली.
सभेमध्ये तरूणाने घातला गोंधळ..!
पाणी योजनेच्या भूमिपूजनाच्या सभेमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी तालुक्याचे ज्येष्ठ नेते अॅड. सुभाष पाटील यांचे नाव न घेता टीकेची झोड उठविले. ही टीका सहन न झाल्यामुळे वांबोरीतील एका तरुणाने सभास्थळी जाऊन भिटे यांच्या समोरील माईक हिस्कावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थितांनी या तरुणाची चांगलीच धुलाई केली, परंतु पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून, या तरुणास सभास्थळापासून दूर नेल्यामुळे पुढील अनर्थ टाळला!