नगर : भोकरच्या वीज उपकेंद्राच्या अधिकार्‍यांना घेराव

नगर : भोकरच्या वीज उपकेंद्राच्या अधिकार्‍यांना घेराव
Published on
Updated on

माळवाडगांव : पुढारी वृत्तसेवा :  पंधरा दिवसांपासून कमी दाबाने मिळणार्‍या वीजपुरवठ्यास कंटाळून श्रीरामपूर तालुका पूर्व परिसरातील शेतकर्‍यांनी भोकर वीज उपकेंद्रातील अधिकारी, कर्मचार्‍यांना घेरावो घालत आंदोलन केले. पाच दिवसांत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर 11 मार्चला खोकरफाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी महावितरण अधिकार्‍यांना दिला. श्रीरामपूर पूर्व गोदाकाठ परिसरातील कमालपूर, घुमनदेव, माळवाडगांव, मुठेवाडगावसह भोकर, खोकर, टाकळीभान, कारेगाव (काही भाग) वडाळा महादेव या गावांना वीजपुरवठा केला जातो.

तालुक्यातील अन्य सबस्टेशनच्या तुलनेत या भोकर सबस्टेशनची जुनाट मशिनरीप्रमाणे यंत्रणाही खिळखिळी झाली आहे. श्रीरामपूर शहराचे कनिष्ठ अभियंता निकम हे वर्ष दोन वर्षांपासून प्रभारी आहेत. अधिकृत तारतंत्री कर्मचारी अवघे दोन बाकी हंगामी रोजंदारीवर असलेले कर्मचारी आहेत. शेतकरी रात्रीचा दिवस करून कांदा, गहू, मका ऊस पिकास अखेरचे पाणी देताना मेटाकुटीला आले आहे. रात्री लाईट देता तर द्या, पण तीही सुरळीत नाही. रात्र-रात्र जागून वीज गायब होते. कधी येईल, यासाठी सबस्टेशनची दुरध्वनी यंत्रणा चालू नाही.

बारावी पाठोपाठ दहावीच्या परीक्षा सुरू आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी लाईट नाही. कंत्राटी कर्मचारी मोबाईल बंद करून ठेवतात. गेली चार दिवसांपासून विजेचा खुपच खेळखडोबा झाल्याने कार्यक्षेत्रातील गावोगावच्या सर्वपक्षीय संतप्त शेतकर्‍यांनी काल अचानक घेरावो आंदोलन केले. यावेळी महावितरण अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तालुका पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

संतप्त सर्वपक्षीय शेतकर्‍यांनी शांततेच्या मार्गाने आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी गणेश छल्लारे, राजेंद्र कोकणचे, कमालपुरचे सरपंच सचिन मुरकुटे, भोकरचे उपसरपंच महेश पटारे, मुठेवाडगांवचे सरपंच सागर मुठे, माळवाडगावचे भाऊसाहेब काळे, शेतकरी संघटनेचे शरद आसने, कारेगावचे शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे, सुभाष पटारे, युवराज जगताप, छावाचे नितीन पटारे, घुमनदेवचे युवा कार्यकर्ते भैरव कांगुणे, संभाजी ब्रिगेडचे शिवाजी पवार अनिल पाचपिंड, ज्ञानेश्वर मुठे या सर्वांनी आपल्या भाषणातून भोकर सबस्टेशन कारभारा व वीज खेळखंडोबा विषयी संतप्त भावना व्यक्त केल्या. कमालपूर, घुमनदेव, भोकर, खोकर, कारेगाव मुठेवाडगाव, माळवाडगाव येथील शेतकरी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जे. ई. निकम उपस्थित होते.

मार्चपर्यंत रात्रंदिवस कर्मचारी तैनात : छावडा
भोकर सबस्टेशनला वरतूनच कमी दाबाने वीजपुरवठा मिळत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याची स्पष्ट कबुली श्रीरामपूर विभागाचे सहा. कार्यकारी अभियंता छावडा यांनी शेतकर्‍यांसमोर बोलताना दिली. आपला मार्चपर्यतचाच प्रश्न असल्याने आपण येथे येण्यापूर्वी आम्ही तातडीची आढावा मिटींग घेतली. मार्चपर्यंत रात्रंदिवस कर्मचारी तैनात ठेवून वीजपुरवठा वीजपुरवठा सुरळीत करू. पाहिजे तेवढा उच्च दाबाचा विजपुरवठा सबस्टेशनला मिळण्यासाठी वरिष्ठ कार्यालयास आपल्या तीव्र भावना आपल्या तीव्र भावना लेखी स्वरूपात कळवू असे आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news