वाळकी : भोरवाडी येथे रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार

वाळकी : भोरवाडी येथे रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात प्रथमच भोरवाडी येथे रविवारी (दि.2) नगर तालुका केसरी बैलगाडा शर्यत पार पडल्या. सकाळी नऊ वाजेपासून सुरू झालेली ही चित्तथरारक शर्यती तब्बल दहा तास चालल्या. यामध्ये 190 गाडामालकांनी सहभाग घेतल्याने या शर्यतीसाठी सुमारे 800 बैल आणि 200 घोडे आणण्यात आले होते. दिवस भरात जिल्ह्यातील अनेक प्रेक्षकांनी या शर्यतीचा रंगलेला थरार अनुभवला.

न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्याने राज्यात व देशभरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे. मात्र, नगर तालुक्यात इतिहासात प्रथमच बैलगाडा शर्यतीचे आयोजन भोरवाडी येथील हनुमान सप्ताह यात्रा उत्सवानिमित्त ग्रामपंचायत सदस्य व उद्योजक राहुल जाधव युवा मंचतर्फे करण्यात आले. या बैलगाडा शर्यती बाबत मोठी उत्सुकता होती. त्यामुळे या शर्यती पाहण्यासाठी दिवसभरात हजारो प्रेक्षकांनी हजेरी लावली.

बैलगाडा शर्यतीचे विशेष आकर्षण म्हणजे पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला मोटारसायकल व 81 हजार रोख, दुसर्‍या क्रमांकाला फ्रीज व 61 हजार रोख, तिसर्‍याला एलईडी टीव्ही व 51 हजार रुपये रोख, चौथ्याला कुलर, अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती. या शिवाय घाटाचा राजा तसेच फळी फोड साठीही रोख बक्षिसे दिली गेली. विजेत्यांवर सुमारे पाच लाख रुपयांच्या बक्षिसांचा धुरळा उडविण्यात आला.

दिवसभर चाललेल्या या शर्यतींच्या नियोजनासाठी राहुल जाधव यांच्यासह युवामंचचे अध्यक्ष विजय लोमटे, उपाध्यक्ष अक्षय पानसरे सचिव प्रतिक भोर आदींसह सर्व पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले. शर्यतीत विशाल घावटे, बाळू मदने, प्रवीण गीते या गाडा मालकांनी प्रथम क्रमांकाचे बक्षिस जिंकले, तर द्वितीय प्रवीण वाघमारे, राजेंद्र घावटे, सदा सोनवणे यांनी मिळविला. तिसरे बक्षिस नाना गुळवे, कुंडलिक चौधरी, संतोष चौगुले यांनी, तर चौथे बक्षिस वाखारे, पायमोडे गाडा मालकांना मिळाले.

बेलगाम बैलांना लगाम घालणार : खासदार विखे

नगर तालुक्यातील बैलगाडा शर्यतीत खासदार विखेंचा ही गाडा असावा, यासाठी त्यांना बैलजोडी खरेदी करावी, असे कर्डिले यांनी सांगितले. यावर खासदार विखेंनी बैलजोडी घेऊच; पण नगर दक्षिणेत उधळलेल्या बेलगाम बैलांनाही लगाम घालण्याच काम करू, अशी टोलेबाजी केली.

गावागावात बैलगाडा शर्यती सुरू करणार : कर्डिले

ही शर्यती पाहण्यासाठी खासदार डॉ.सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, भाजप युवा मोर्चाचे अक्षय कर्डिले यांच्यासह विविध गावचे सरपंच, नगर शहरातील नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री कर्डिलेंनी राहुल जाधव व त्यांच्या सहकार्‍यांचे कौतुक करत नगर तालुक्यात विविध गावांमध्ये अशा प्रकारे बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news