चिचोंडी पाटील(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील सेंट्रल बँकेमध्ये शेतकर्यांना पीक कर्जासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. चिचोंडी पाटील लगतच्या मराठवाड्यातील दौलावडगाव, सालेवडगाव, नांदूर या गावांमध्ये सेंट्रल बँकेकडून आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त शेतकर्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. मात्र, काही शेतकर्यांना बँकेच्या अधिकार्यांनी कर्ज देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
तुमचे गाव आमच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे त्यांना सांगितले जाते. मागील महिन्यापूर्वीच या बँकेकडून त्याच गावातील काही शेतकर्यांना पुन्हा पीक कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली. तर, मग ही बँक कुणा राजकीय पुढार्याच्या आदेशाने काम करते की काय, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या बँकेचे शाखाधिकारी हे राज्याबाहेरील असल्याने अनेक नागरिकांना त्यांचे म्हणणे मांडण्यास अडचण निर्माण होते. ग्रामीण भागात हिंदी भाषेचा वापर जास्त प्रमाणावर होत नसल्याने, अनेकदा खातेदारांना मनस्ताप सहन करण्याची वेळ येते.
या बँकेत पासबुक भरून देण्यासाठी कर्मचारी, अधिकार्यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. फक्त शुक्रवारी पासबुक भरून मिळेल, असा आदेशच अधिकार्यांनी काढला आहे. त्याचबरोबर पासबुक नसले तर पैसे दिले जात नाहीत, अडवणूक केली जाते. यापूर्वीही बँकेच्या अनेक तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या. परंतु, कारवाई होत नसल्याने मनमानी कारभार चालूच आहे.
हेही वाचा