कोळगाव : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील मुख्य चौकातील इंडिया नंबर वन या खासगी कंपनीचे एटीएम गॅस कटरने फोडण्याचा काही चोरट्यानी बुधवारी पहाटे प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न गॅस कटरमधील गॅस संपल्याने असफल झाला. मशीनमधील अंदाजे एक ते दीड लाख रुपये वाचले. माहिती मिळताच बेलवंडी पोलिसांना घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
कोळगाव येथील मुख्य चौकात असणार्या इंडिया नंबर वन या खासगी कंपनीचे एटीएम मशीन गॅस कटरने कापून आतील रक्कम चोरुन नेण्याचा चोरट्यानी प्रयत्न केला.
चोरट्यांनी एटीएम मशीनसमोरील भागातील प्लास्टिक दरवाजा गॅस कटरने सहाय्याने कट केला. मात्र, आतील लोखंडी दरवाजा कट करताना गॅस कटरचा गॅस संपल्याने चोरट्यांनी मशीनचा दरवाजा खोलण्यासाठी कटावणीचा वापर केला. मात्र, दरवाजा न उघडल्याने चोरट्यांचा डाव असफल झाला. आणि मशीन मधील सुमारे एक ते दीड लाखाची रक्कम वाचली. एटीएम मशीन फोडण्यासाठी चोरटे केबिनच्या आत जाऊन कुणाला काही समजू नये यासाठी केबिन मधील लाईट तसेच सीसीटिव्ही गॅस कटरच्या काजळीने झाकून टाकले. मात्र गॅस संपल्याने मशीन फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला.
घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे 16 रोजी कोळगाव मध्ये येत असताना पूर्वसंध्येलाच चोरीची घटना घडत असल्याने पोलिसांपुढे चोरट्यांना शोधून अटक करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. एटीएम ज्या कॉम्प्लेक्समध्ये आहे, त्यातील संजय लगड, सरदार, उत्तम लगड, विजय शेलार, वैभव नलगे, अनिल दळवी, कोकाटे व इतर गाळेधारकांनी या परिसरात पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी केली.