नगर : पुढारी वृत्तसेवा : हिंगोली येथील अल्पवयीन मुलीला नगरमध्ये आणून व तिला नगरमध्ये एका खोलीत डांबून तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. हिंगोली येथून मुलीला पळवून आणणार्या महिलेला व मुलीवर अत्याचार करणार्या नराधमाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी पार पडली. नीलेश सुनील उमाप, माया रमेश आगलावे (दोघे मूळ रा. इंदिरानगर, कळमनुरी, जि. हिंगोली, हल्ली रा.शिवाजीनगर, निंबळक ता. जि. अहमदनगर) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडिता ही हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीतील इंदिरानगरात तिच्या सावत्र आईसोबत राहत होती.
आरोपी माया आगलावे हिच्याशी पीडित मुलीची जून 2020 मध्ये ओळख झाली होती. पीडिता मंदिरात बसलेली असताना, मी तुला तुझ्या आईकडे घेऊन जाते व तुला मारू नको असे सांगते, असे म्हणून आरोपी माया आगलावे पीडितेला अहमदनगर येथे घेऊन आली. त्यानंतर नीलेश सुनील उमाप, माया रमेश आगलावे या दोघांनी पीडितेला एका खोलीत डांबून व तिचे हातपाय बांधून मारहाण केली.
त्यानंतर आरोपी नीलेश उमाप हा मुलीवर सतत अत्याचार करत होता.
पीडिता गर्भवती राहिल्याने आरोपींनी तिला गोळ्या देवून गर्भपात केला. त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये एका दिवशी आरोपी उमाप पीडितेवर अत्याचार करत असताना पीडितेने आरडाओरड केली. परिसरातील लोकांनी पीडितेची तेथून सुटका करत, एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. याबाबत फ्रीडम फर्म संस्थेचे समन्वयक संदेश किसन जोगेराव यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक पाठक यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून आडसूळ यांनी सहकार्य केले.