

नगर : पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीमधील इच्छुकांना प्रदेश समितीवर संधी मिळाल्याने ते आपसुकच बाद झाले आहेत. दरम्यान मेअखेरीस नगर शहर आणि दक्षिण, उत्तर असे तीन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या प्रदेश कार्यकारिणीत माजी आमदार चंद्रशेखर कदम व त्यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, मधुकर पिचड यांना स्थान देण्यात आले आहे.
भैय्या गंधे (नगर शहर), राजेंद्र गोंदकर (उत्तर), अरुण मुंडे (दक्षिण) यांच्या जिल्हाध्यक्षपदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नवीन अध्यक्षासाठी इच्छुक असलेल्यांना प्रदेश समितीत संधी देण्यात आली आहे. एक व्यक्ती एक पद या नियमामुळे प्रदेश कार्यकारिणीत संधी मिळालेले जिल्ह्यातील इच्छुक आता अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. राज्यातील सत्ताबदलानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूलमंत्रिपद मिळाल्याने, नव्या पदाधिकारी निवडीत त्यांचाच शब्द प्रमाण असेल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली. इच्छुकांना प्रदेश कार्यकारिणीत संधी देत जिल्हाध्यक्ष पदासाठी विखे समर्थकांचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दोनदा जिल्हा दौर्यावर आले; मात्र जिल्हाध्यक्षपदाचा तिढा काही सुटला नाही. उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांना प्रदेश समितीवर निमंत्रित सदस्य, तर दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांना प्रदेश चिटणीस या पदावर संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता नवा अध्यक्ष प्रदेश पातळीवरून जाहीर केला जाणार आहे. मेअखेरीस जिल्ह्यातील तिन्ही अध्यक्ष जाहीर केले जातील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
आमदार मोनिका राजळे, स्नेहलता कोल्हेंना संधी?
दक्षिण व उत्तर जिल्हाध्यक्ष हा मंत्री विखे पाटील यांच्या मर्जीतील असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उत्तरेतून माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांचे नाव चर्चेत आले आहे. दक्षिणेतून नगर तालुक्याचे दिलीप भालसिंग यांचे नाव पुढे आल्याचे समजते. असे असले तरी उत्तर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी ही माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यावर तर दक्षिणेची जबाबदारी आमदार मोनिका राजळे यांच्यावर सोपविली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. जिल्ह्यातील महिला आमदार म्हणून राजळे यांचे नाव मंत्रिपदाच्या चर्चेत होते. मात्र विस्तार रखडल्याने त्यांना संधी मिळाली नाही. आता जिल्हाध्यक्ष पदावर त्यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्नेहलता कोल्हे या माजी आमदार आहेत. त्यांना उत्तर जिल्हाध्यक्षपद देऊन जिल्ह्यात समतोल साधला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
गंधे, पारखी शहराध्यक्ष पदाच्या चर्चेत
भाजप नगर शहराध्यक्ष पदासाठी विद्यमान अध्यक्ष भैया गंधे यांनी फेरनियुक्तीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. माजी नगरसेवक सचिन पारखी यांचेही नाव शहराध्यक्ष पदाच्या चर्चेत आले आहे. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांचे बंधू किशोर यांना प्रदेशवर निमंत्रित सदस्यपद मिळाल्याने बाबासाहेब हेही नगर शहराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाद झाल्याचे सूत्रांनी सांगितले.