

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : आशा सेविका व गटप्रवर्तक महिलांच्या मानधनाचा अध्यादेश न निघाल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील अशा सेविका व गटप्रवर्तक महिला आक्रमक झाल्या. येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर शासनाविरोधी जोरदार घोषणाबाजी करीत त्यांनी थाळीनाद आंदोलन केले. आशा सेविका व गटप्रवर्तक महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते प्रांत कार्यालयापर्यंत घंटानाद आंदोलन केले. यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या. आशा सेविका यांना 7 हजार तर गटप्रवर्तक महिलांना 10 हजार रुपये मानधन मिळावे, अशी मागणी आरोग्य मंत्र्यांनी तोंडी स्वरूपात मान्य करून, आंदोलनात दिलेला शब्द पाळला नाही.
मुंबई येथे आझाद मैदानावर 15 दिवसापासून महिला उपोषणास बसलेल्या आहेत. 5 दिवसांपासून संगमनेर प्रांत कार्यालयासमोर महिलांनी चुलबंद आंदोलन सुरू केले, मात्र शासनाला जाग येत नाही. यामुळे संतप्त महिलांनी घंटानाद आंदोलन सुरू केले. आंदोलनात शिवसेना उबाठा पक्षाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, माजी तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, वंचितचे अजीज ओहरा, दीपक साळुंखे व सचिन साळुंखे यांनी सहभाग घेत पाठिंबा दिला.
आशा सेविका व गट प्रवर्तक महिलांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता गोरगरिबांची सेवा केली. आयुष्यमान भारत योजनेसाठी दिवस-रात्र काम केले. यामुळे खर्या अर्थाने महाराष्ट्र या योजनेमध्ये देशात पहिला आला. यात आशा सेविका व गट प्रवर्तक महिलांचे योगदान आहे. आमच्या मानधनाचा अध्यादेश काढण्यास शासन का कुचराई करते, असा संतप्त सवाल घारगाव प्राथ. आरोग्य केंद्राच्या घटप्रवर्तक सविता लेंडे व रिजवाना शेख यांनी केला.
हेही वाचा