

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : वेळेवर बस न सुटल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी एस. टी. आगाराचे गेट बंद करुन आंदोलन केले.
निंबादैत्य नांदूरला दुपारी जाणार्या बसेस न सोडल्याने संतप्त प्रवाशांनी एस टी आगाराचा दरवाजा बंद करत निषेध व्यक्त केला. पाथर्डीतून दररोज दैत्यनांदूरला दुपारी एक व तीन वा. बस असते.
या बसचा फायदा अनेक गावांतील विशेषतः विद्यार्थ्यांना होतो. बुधवारी पाथर्डीचा आठवडे बाजार असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी होती. दुपारी एकची बस सोडली नाही. तीन वाजताची बसही तासभर उलटून न सुटल्याने प्रहारचे तालुकाध्यक्ष अरुण आंधळे यांनी काशिनाथ आंधळे, जगन्नाथ बडे, राहुल आंधळे, मंदा आंधळे यांच्यासोबत आगाराचे दार बंद केले. आगारप्रमुख व प्रवाश्यांत जोरदार शाब्दिक चकमक झाली. अखेरीस बस सोडण्यात आली.