

नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने दूधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले असले तरी जिल्ह्यातील लाखो दुग्ध उत्पादकांसाठी हे अनुदान एक मृगजळ ठरणार आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे सहकारी दूध संघांना दूध घालणार्या उत्पादकांनाच हे अनुदान दिले जाईल, तर खासगी संकलन केंद्रात दूध टाकणारे दुग्धउत्पादक यापासून वंचित राहणार आहेत. जिल्ह्यात सहकारी दूध संघांकडे दैनंदिन 7 लाख 78 हजार लिटरचे संकलन आहे, तर याउलट खासगी, मल्टिस्टेट व इतर असे तब्बल 38 लाख लिटर दूध उत्पादक घालतात. त्यामुळे सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे येणार्या काळात जिल्हाभरातून दूध अनुदानाला नाराजीची उकळी येणार असल्याचे संकेत आहेत.
शेतमालाचे भाव पडले आहेत. त्यात शेतीला जोडधंदा असलेल्या दुग्धव्यवसायाचेही कंबरडे मोडले आहे. पशुखाद्याचे भाव वाढते असताना दुधाचे दर मात्र 27-28 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे अधिवेशनात यावर चर्चा होऊन पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 1 जानेवारी ते 29 फेब्रुवारी या कालावधीत लिटरला पाच रुपयांचे अनुदान देण्याची दिलासादायक घोषणा केली.
मात्र हे अनुदान सहकारी दूध संघांनाच दिले जाणार असल्याची बातमी बाहेर येताच खासगी दूध संकलन केंद्रांना दूध घालणार्या उत्पादकाच्या मनात संभ्रम तयार झाला आहे. जर सहकारी दूध संघाना दूध घालणार्या शेतकर्यांनाच हे अनुदान मिळाले तर गावोगावी खासगी संकलन केंद्रात दूध ओतणारे दोन लाखांपेक्षा अधिक दूग्ध उत्पादक अनुदानापासून वंचित राहणार आहेत.
अटी व नियमावलीने डोकेदुखी
दूध अनुदान हे सरकारी निकषाच्या चौकशीत अडकणार आहे. शेतकर्यांनी सहकारी दूध संघांनाच दूध घातलेले असले पाहिजे, त्या संघाने 29 रुपये दर दिला असेल तरच अनुदान दिले जाणार आहे, पाच रुपये मिळण्यासाठी सहकारी दूध संघाने दूध बिल शेतकर्यांच्या बँक खात्यातच ऑनलाईन जमा केलेले असावे, तसेच हे अनुदान डीबीटीद्वारे शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी दूध उत्पादकांचे बँक खाते हे आधारकार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. त्याची पडताळणी केली जाणार आहे.
जिल्ह्यातील दूध संघांची सद्यःस्थिती
अहमदनगर दूध संघ ः 4200 लिटर
पाथर्डी तालुका दूध संघ ः 16765
शेवगाव तालुका दूध संघ ः संकलनबंद
जामखेड तालुका दूध संघ ः संकलन बंद
कर्जत तालुका दूध संघ ः 14500
नेवासा तालुका दूध संघ ः संकलन बंद
श्रीरामपूर तालुका दूध संघ ः संकलन बंद
श्रीरामपूर जिल्हा दूध संघ ः संकलन बंद
राहुरी तालुका दूध संघ ः 25462
गोदावरी खोरे दूध संघ ः 161524
संगमनेर तालुका दूध संघ ः 341924
अमृतसागर दूध संघ ः 97844
राहाता तालुका दूध संघ ः 27420
दररोजचे दूध संकलन ः 45,25,843 लिटर
सहकारी दूध संघ ः 704878 लिटर
खासगी संकलन केंद्र ः 26,03,178
इतर खासगी संकलन ः 11,66,227
मल्टिस्टेट संस्था ः 51560
दूध अनुदानाबाबतचा शासन आदेश अजून निघालेला नाही. तत्पूर्वी मंत्री महोदयांना अनुदानाच्या निकषात मल्टिस्टेटला तसेच खासगी संकलन केंद्रांना बसवावे, यासाठी आपण मागणी करणार आहोत. तशी विनंतीही केली आहे.
-गणेश भांड, चैतन्य मिल्क, देवळाली प्रवरासहकारी संघांना दूध जातेय किती, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. सहकारीला द्याच, पण खासगी संकलन केंद्रात दूध घालणार्या शेतकर्यांना मात्र अनुदानापासून वंचित ठेवू नका, अशी मागणी आम्ही मंत्री विखे पाटील यांच्याकडे करणार आहोत. – संतोष ढोकणे, चेअरमन, कुलस्वामिनी मिल्क