नगर : पुढारी वृत्तसेवा : इयत्ता दहावीच्या पहिल्याच पेपरला तब्बल 911 विद्यार्थ्यांनी दांडी मारली, तर शहरातील एका परीक्षा केंद्रावर 'मराठी'ची कॉपी करणार्या एका विद्यार्थ्याला शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी रिस्टिकेट केले. दरम्यान, ज्या परीक्षा केंद्रावर कॉपी आढळलेल, त्या पर्यवेक्षकावर कारवाईची मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी संकेत दिले आहेत.
दहावीची परीक्षा काल गुरुवारपासून सुरू झाली आहे. 179 केंद्रांवर 59821 परीक्षार्थींची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. काल मराठीचा पहिला पेपर होता. या पेपरला 911 परीक्षार्थी गैरहजर होते. त्यामुळे 58910 परीक्षार्थींनी हा पेपर दिला आहे. परीक्षा कॉपीमुक्त घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी संवेदनशील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देण्याचा कार्यक्रम कालही सुरूच ठेवला. त्यामुळे बहुतांशी परीक्षा केंद्रावर कडक पर्यवेक्षण झाल्याचे दिसले.तरीही शहरातील एका परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी एका कॉपीबहाद्दराला रंगेहाथ पकडून संबंधितावर कारवाई केली.