नगर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून घडणार्या अप्रिय घटनांमुळे शालेय मुली आणि त्यांचे पालकही चिंतेत आहेत. मात्र, आता मुलींनाच संकटांचा सामना करता यावा, यासाठी समग्र शिक्षांतर्गत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रम राबविला जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहावी ते बारावीच्या तब्बल 2 लाख 34 हजार 291 मुलींना कराटे, बॉक्सिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे आता शालेय मुली असुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली जाऊ लागली आहे. या संदर्भात शासन स्तरावरूनही कठोर कायदे केले जात आहेत.
मात्र, या पलिकडेही मुलींनाच स्वः संरक्षणाचे धडे दिले तर त्या निश्चितच आपल्यावरील संकटाचा, हल्ल्याचा प्रतिकार करू शकतील, अशी शासनाची भावना आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिकांच्या आयुक्तांना प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी मुलींना स्व-संरक्षण प्रशिक्षण देताना सक्षम बनविण्याचा मानस व्यक्त केला आहे. या पार्श्वभुमीवर नगर जिल्ह्यातील इयत्ता सहावी ते बारावीच्या सुमारे अडीच लाख विद्यार्थींना प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्गदर्शनात 31 मार्च 2023 पर्यंत संबंधित प्रशिक्षण देण्याच्याही सूचना केल्या आहेत.
मुलींना प्रमाणपत्र मिळणार !
कराटे, ज्युडो, बॉक्सिंग इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी शासनाकडूनच पात्र प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. साधारण 100 तासांचे प्रशिक्षण होणार.
समग्र शिक्षण अंतर्गत मुलींच्या सक्षमी करणासाठी शासनाने उचलले पाऊल स्वागतार्ह आहे. यातून नक्कीच मुलींच्या सुरक्षिततेसाठी फायदा होईल. यासाठी शासनाच्या मार्गदर्शनानुसार पुढे काम होईल.
– भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी