नगर : विजेचा खेळखंडोबा; शेतकरी हवालदिल

नगर : विजेचा खेळखंडोबा; शेतकरी हवालदिल
Published on
Updated on

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : ऐन खरिपात पावसाने ताण दिल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. दोन पैसे मिळतील या अपेक्षेने शेतकर्‍यांनी मोठा खर्च करून कपाशीसह, इतर खरीप पिकांची लागवड केली आहे. ऊस,डाळिंब आदींसह इतर फळ बागा, ऊस यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना एकीकडे पावसाने ताण दिलेली असतानाच दुसरीकडे महावितरणच्या गलथान कारभारामुळे नेवासा तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. नेवासा तालुक्यात महावितरण प्रशासनाला हाताशी धरुन राजकीय साठमारीसाठी तालुक्यातील शेतकर्‍यांचा जाणीवपूर्वक छळ सुरु असल्याचा गंभीर आरोप जाणकारांनी केला आहे.

नेवासा तालुक्यात 21 वीज उपकेंद्रे कार्यान्वित असून सर्वच उपकेंद्रातून विद्युत पुरवठा कमी दाबाने केला जात असून अनेक सबस्टेशन ओव्हरलोड आहेत. यामुळे नेवासा तालुक्यातील गावागावात विजेचा पुरता खेळखंडोबा झाला आहे. पुरेश्या दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने विहिरी, कूपनलिकांना पाणी असूनही वीज पुरवठ्या अभावी पिकांना देत येत नसल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्या देखत पिके जळत असल्याची विदारक परीस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. विद्युत वाहक तारा जीर्ण झालेल्या असल्याने थोडे जरी वादळ झाले तरी तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित होतो व सदर तारा जोडण्यास मोठा कालावधी लावला जात आहे. तालुक्यात 200 ते 250 विद्युत खांब पडलेले असून वीज तारा अक्षरशः लोटांगण घेत असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती निर्माण झालेली आहे.

मोडकळीस आलेले खांब उभे करण्यास 4 ते 5 महिने उलटून जातात प्रसंगी शेतकरी, ग्रामस्थ परिस्थिती नसूनही स्वतः खर्च करून पदरमोड करून खांब उभे करतात, तालुक्यातील अनेक विद्युत रोहित्रे (डीपी) यांना ऑईल, वापराची केबल, फ्यूज यांचाही पुरवठा केला जात नाही त्यामुळे अनेक दिवस रोहित्रे बंद राहत असल्यामुळेही शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते. अनेक गावातील विद्युत रोहित्रे जळाल्यानंतर वीज बिले भरण्याची सक्ती महावितरण करते. परंतु विद्युत रोहित्रे महावितरण मार्फत भरून न देता खासगी ठिकाणाहून भरून आणण्याची वेळ शेतकर्‍यांवर येते आहे यास सर्वस्वी महावितरण जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ओव्हरलोडमुळे सर्वच सबस्टेशनला कायम ट्रिपिंग येते त्यामुळे पाथरवाला, सुकळी, पिंप्री शहाली, पाचेगाव, पुनतगाव, जैनपूर, लोहोगाव, धनगरवाडी, मांडेगव्हाण, शिंगवेतुकाई, बेल्हेकरवाडी, खेडलेपरमानंद , शिरेगाव, अंमळनेर, निंभारी, खुपटी, हंडीनिमगाव, उस्थळदुमला, बाभुळवेढा, रस्तापूर, प्रवरासंगम, गळनिंब, मंगळापूर, खडका, घोगरगाव, सलाबतपुर, गोलगाव, खेडलेकाजळी या गावामध्ये दररोज विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत.

जिल्ह्यात वीजबिलाची चांगली वसुली महावितरणला नेवासा तालुक्यातून होत असूनही विद्युत सुधारणेच्या बाबतीत सापत्न वागणूक का दिली जाते? हा प्रश्न नेवासा तालुक्यातील जनतेला पडला आहे. महावितरणच्या या भोंगळ तसेच बेजबाबदार कारभारामुळे नेवासा तालुक्यातील 65 हजार हेक्टर वरील पिके धोक्यात आली आहेत.

महावितरणच्या गलथान कारभारामुळे नेवासा तालुक्यात वीजेची टंचाई निर्माण झाली आहे. यास सर्वस्वी महावितरण प्रशासन जबाबदार आहे.मंजूर कामे, फिडर विलगीकरणं, एसडीटी बसविण्याची तसेच दुरुस्तीची कामे तातडीने सुरु करावीत. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.
                                                    – आमदार शंकरराव गडाख.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news