संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरालगत असणाऱ्या पाव बाकी परिसरातील सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत सर्वप्रथम दरोडेखोरांनी सुनील नाईकवाडी यांच्या बंगल्यावरती दरोडा टाकून दरोडेखोरांनी सुमारे १ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. तसेच सुके वाडी शिवारातील समनापूर ते घुलेवाडी रोडवरील उपसरपंच सुभाष कुटे यांच्या घराच्या शेजारी असलेले त्यांचे बंधू उत्तम कुटे यांच्या घरावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी त्यांच्या घरातील महिलांना चाकू, लोखंडी टामी, पाईप अशा शस्त्रांचा धाक दाखवित सुमारे ३ लाख ६३ हजारांचा असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी चोरून नेला असल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेल्या अधिक माहिती अशी की संगमनेर शहरलगत असणाऱ्या पावबाकी आणि सुकेवाडी शिवारामध्ये सुकेवाडी-कारखाना रस्त्यावरील उपसरपंच सुभाष कुटे यांच्या वस्तीसह पावबाकी परिसरात सोमवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास सहा सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. सर्वप्रथम सुकेवाडी शिवारातील कुटेवस्ती वरील एका रेषेत असलेल्या सात ते आठ घरांना बाहेरुन कड्या लावल्या. तसेच या परिसरातील उत्तमराव कुटे यांच्या घरात प्रवेश करत दरोडेखोरांनी कुटे यांच्याच मानेला चाकू लावून ऐवज काढून देण्याचा दम भरत कुटे यांच्याकुटुंबातील सदस्यांनी त्यांच्याकडील दहा तोळ्यांहून अधिक वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह जवळ पास सव्वा लाखांचे दागिने ओरबाडून घेतले. दरोडेखोरांनी कपाटातील ऐवजा सह महिला व मुलांच्या अंगावरील दागिनेही ओरबाडून घेतले.
उत्तमराव कुठे यांच्या घरात दरोडेखोरांचा गदारोळ सुरू असताना आसपासच्या घरातील नागरीकही जागे झाले. मात्र दरोडेखोरांनी सगळ्यांच्या घराला बाहेरुन कड्या लावल्याने कोणालाही मदतीसाठी बाहेर येता आले नाही. जवळपास अर्धा तास या वस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरु होता. याच दरम्यान त्यांनी लष्करात सेवेला असलेल्या दातीर या जवानाच्या घरावरही दरोडा घातला, यावेळी जवान दातीर हे कर्तव्यावर गेलेले होते तर त्यांच्या घरात केवळ त्यांची पत्नी व मुले होती. याच वस्तीवरील एका म्हातारीकडे शेळ्या विकून आलेले पैसेही दरोडेखोरांनी घेऊन गेल.
हा सगळा प्रकार सुरु असतांना सुके वाडीचे उपसरपंच सुभाष कुटे यांनी आपल्या खिडकीतून चोरऽ.. चोरऽ अशी ओरड करण्यास सुरुवात केल्याने दरोडेखोरांच्या टोळीतील एका साडेसहा फूटांहून अधिक उंच असलेल्या चोरट्याने आपल्या हाता तील लोखंडी पहार उगारुन त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. येथून पुढे जाताना चोरट्यांनी पेशाने वाहनचालक असलेल्या सुनील नाईकवाडी यांच्या घरावरहीदरोडा घालून सोन्याचे दागिने व रोकड लुटून दरोडेखोर पसार झाले.