

अमोल अंत्रे
श्रीरामपूर(अहमदनगर) : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात सेवा देणार्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे बस चालक- वाहक बस रस्त्यावर धावताना आपला मनमानीपणा करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. रस्त्यावर धावणार्या परिवहन महामंडळाच्या बसेसमधून महिला, वयोवृद्ध, नोकरदार, शिक्षणासाठी शहरात जाणारे विद्यार्थी रोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. परिवहन मंडळाच्या बसेसने प्रवास करताना बस वाहक-चालक स्वतः मालकीची गाडी असल्याप्रमाणे वागताना दिसतात. वाहकांकडून प्रवास करणार्या अनेक वयोवृद्ध प्रवाशांना वयाचा विचार न करता अरेरावीची भाषा वापरली जाते.
तसेच महिलांसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या महिला सन्मान योजनावरून अनेकवेळा महिलांवर भाष्य करण्याचे प्रकार दिसून येत आहे. वाहकाकडून प्रवास करताना एखाद्या प्रवाशांकडे सुट्टे पैसे नसल्यास, त्या प्रवाशांसोबत वादावाद घातला जातो. किंवा सुट्टे पैसे नसल्याच्या कारणांमुळे बसमधून खाली उतरून देण्यांचे प्रकार घडताना दिसून आले. महिला सन्मान योजनेत निम्मे भाड्यात प्रवास योजना सुरू केल्याने महिला वर्ग सध्या बससेने जास्त प्रमाणात प्रवास करताना दिसतात. याचबरोबर शिक्षणासाठी शहरात जाणार्या मुलींकडून सुट्टे पैसे नसल्याने वाहकांकडून पूर्ण भाडे आकारले जात असल्याचे बोलले जाते.
उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस असल्याने बाहेर फिरण्यासाठी अथवा लग्न कार्यासाठी बाहेर जाताना नागरिक परिवहन महामंडळाच्या बसेसला प्राधान्य देत आहे. त्यामुळे गर्दीचे प्रमाण वाढले असून यात महिला वर्गाचे प्रमाण जास्त दिसून येते. तसेच नोकरीनिमित्त शहराच्या ठिकाणी ये-जा करणार्या प्रवाशांना वेळेवर पोहचण्याची घाई असते. त्यामुळे नोकरदार मिळेल त्या बसेस ने प्रवास करतात.
परंतु वाहकाकडून गर्दी असल्याचे कारण देत, अथवा जागा शिल्लक नाही. पाठीमागून बस येत आहे. असे सांगून प्रवाशांना घेण्याचे टाळतात. असे प्रकार दिसून आले आहे. या वाहक- चालकांच्या मनमानीपणाचा वयोवृद्ध, महिला, नोकरदार प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. या बाबीकडे श्रीरामपूर, नगर, संगमनेर, शिर्डी बसडेपो चालकांनी लक्ष घालून वाहक- चालकांना तशा सूचना द्याव्यात असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
अधिकृत बस थांबा दिला असताना काही वाहक चालकांकडून येथे बस थांबा नाही असे सांगून अधिकृत बस थांब्यावर बस थांबवण्यास नकार दिला जातो.
सध्या सुट्टी असल्याने तसेच शाळा सुरू होणार आहे. सणा सुदीचे दिवस आल्याने गर्दीचे प्रमाण वाढण्याचा विचार करता महामंडाळाने बसेस वाढविण्याची गरज आहे.
राज्य सरकार महिलांसाठी महिला सन्मान योजना राबवत आहे. त्यात 50%, अर्धे भाड्यात प्रवास, यामुळे बसमध्ये गर्दीचे प्रमाण वाढले आहे. त्यात महिलांचे प्रमाण जास्त दिसून येते. अर्धे तिकीट काढून आरामात सीटवर बसून प्रवास केला जातो. पुरूष मंडळींना पूर्ण तिकीट काढून उभ्याने प्रवास करावा लागतो. त्यामुळे राज्य सरकारने पुरूषांना ही अर्धे तिकीट भाड्यात प्रवास योजना सुरू करावी.
– गणेश सगरगिळे
प्रवाशी