

गणोरे; पुढारी वृत्तसेवा : आढळा परिसरातील जायनावाडी पासून सावरगावपाट पर्यंतच्या गावांना वरदान ठरणारा पिंपळदरावाडी साठवण बंधार्याला शिंदे सरकारने हिरवा कंदिल देऊन 40 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या पिंपळदरावाडी साठवण बंधार्याचे काम लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती अभियंता बाजीराव दराडे यांनी दिली.
गेल्या 40 वर्षांपासून हा साठवण बंधारा व्हावा, अशी मागणी होती. अभियंता बाजीराव दराडे 2012 जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्यांनी सातत्याने या बंधार्याची मागणी लावून धरली होती. त्यांनी स्वखर्चाने प्रस्ताव तयार करुन तांत्रिक छाननीसाठी कार्यकारी अभियंता यांचे कडे पाठवला होता.
छाननी अवलोकनानंतर पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मेरीकडे मान्यंतेसाठी पाठवण्यात आले. यासाठी अनेक अडचणी आल्या. परंतु मधुकर पिचड मंत्री असताना या बंधार्या संदर्भात कॅबीनेटमध्ये चर्चा करून अखेर 2013 ला जलविज्ञान मेरी नाशिक या संस्थेने बंधार्याच्या प्रास्तावास मंजुरी दिली.
यानंतर हा प्रस्ताव जिल्हा नियोजनाकडे सादर करण्यात आला. परंतु सदरचा प्रस्ताव तांत्रिक डिझाईन व चुकीच्या अंदाजपत्रकांमुळे जिल्हा नियोजनांनी तो रद्द केला. यानंतर परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन औरंगाबाद महामंडळाकडे पाठवण्यात आला. या सर्व बाबी घडत असताना अनेक वेळा सरकार बदलत असल्याने या प्रस्तावासंदर्भात अनेक अडचणीला सामोरे जावे लागले.
एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ताबडतोब खासदार सदाशिव लोखंडे व बाजीराव दराडे यांनी पाठपुरावा केल्यानंतर आठ दिवसात पिंपळदरावाडी या साठवण बंधार्यास मंजुरी मिळून निविदा काढण्या संदर्भात प्रक्रिया चालू करण्यात आली. या कामाची लवकरच निविदा काढण्यात येऊन या साठवम बंधार्याच्या कामास सुरुवात होणार असल्याचे दराडे यांनी सांगितले.
लाभग्रस्त गावे
पिंपळवाडी साठवण बंधार्यामुळे जायनावाडी, बिताका एकदारा, खिरवरविरे, पिंपळदरा वाडी पाडोशी, सांगवी, केळी रुम्हनवाडी, टाहाकारी, समशेरपुर, घोडसरवाडी व सावरगाव पाठ या गावांना लाभ होणार आहे.