श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : यंदा अतिवृष्टीमुळे आसमानी संकटात उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्यांच्या कुटुंबासोबत ग्रामपंचायत कार्यालयासमोर भाऊबीज साजरी करत पेडगाव ग्रामपंचायतीने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. सरपंच पती भगवानराव कणसे यांच्या पुढाकाराने सुमारे 600 लोकांसाठी फराळाची व्यवस्था केल्यामुळे या उपक्रमाची प्रशंसा होत आहे. दीपावली हा आपला सर्वात मोठा सण. आपण आतुरतेने वाट पाहत असतो. दारात रांगोळी प्रकाशाचा लखलखाट, अंगात नवीन कपडे, तर घरात गोड मिठाईचा सुगंध त्यामुळे प्रत्येक सण रीन काढून का होईना पण आपण साजरा करत असतो.
यंदा मात्र अतिवृष्टीमुळे शेतकरी ऐन दीपावलीत संकटात सापडला आहे. मंत्री व सरकारी बाबू शेतकर्यांच्या बांधावर आले आणि पंचनामे करण्याचे आदेश देऊन निघून गेले. मात्र अतिवृष्टीने खरे तर शेतकर्याच्या आर्थिक अब्रूचाच पंचनामा झाला आहे. तो कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, मजुरांनी दीपावली कशी साजरी करावी? हा प्रश्न निर्माण झाला.
या घटकाला सामाजिक भावनेतून दिलासा देण्यासाठी पेडगाव येथे भगवान कणसे यांनी पुढाकार घेतला. आपल्या ग्रामपंचायत पदाधिकार्यांसोबत चर्चा करून, गावातील काही तरुण मित्राच्या सहकार्याने या संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना या दीपावलीच्या आनंदो त्सवात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला. या गोरगरीब कुटुंबातील सदस्य समवेत ग्रामपंचायत समोर भाऊबीज निमित्त फराळाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. यात सुमारे 600 लोकांनी फराळाचा आस्वाद घेतला. त्यामुळे अनेकांच्या चेहर्यावर आनंद व समाधानाबरोबर हसू फुलल्याचे पाहायला मिळाले.
या उपक्रमाबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त करीत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सर्व आयोजित सहकार्यांचे आभार व्यक्त केले. पेडगाव ग्रामपंचायतच्या या आदर्श उपक्रमातून समाजाने बोध घेण्याची गरज आहे.