

सोनई : पुढारी वृत्तसेवा : सोनई येथे नव्याने झालेला जुना वांबोरी डांबरी रस्ता बुधवारी रात्री ट्रॅक्टरने नांगरण्यात आला आहे, याबद्दल परिसरातून संताप व्यक्त होत असून, संबंधितावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे. माजी सभापती सुनील गडाख यांच्या प्रयत्नातून हॉटेल अंजनीपासून जुना वांबोरी रस्त्याचे चांगल्या दर्जाचे काम सहा महिन्यांपूर्वी होऊन परिसरातील ग्रामस्थांची मोठी सोय झाली. बुधवारी रात्री अज्ञात व्यक्तिने हा मुख्य रस्ताच ट्रॅक्टरच्या नांगराच्या साह्याने नांगरून काढला.
त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणार्यांना त्रास होत असल्याने ग्रामस्थांनी सामाजिक बांधकाम अधिकार्यांना याची माहिती देऊन त्याचे छायाचित्रही पाठविले आहे. या संदर्भात बांधकाम अधिकारी, सोनईचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी व ग्रामसेवक संदीप वाडेकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. बांधकाम अधिकारी सोनई पोलिसांकडे तक्रार नोंदविणार आहे.