पिचड थांबले थोडे …आमदारांनी दामटले घोडे!

पिचड थांबले थोडे …आमदारांनी दामटले घोडे!

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  राजुर येथील प्रसिद्ध डांगी व संकरीत जनावरांच्या प्रदर्शनास धावती भेट देत माजी आमदार वैभव पिचड आले नि थोड्यावेळेत निघून गेले, मात्र आ.डॉ. किरण लहामटे यांनी प्रदर्शनाचा मनमुराद आनंद लुटला. चक्क घोडेस्वारी करीत फेरफटका मारुन त्यांनी उपस्थितांच्या भुवया उंचविल्याचे अनोखे चित्र राजुरमध्ये पहावयास मिळाले. या प्रदर्शनामध्ये ाईगतपुरी तालुक्यातील धामणी गावचे भाऊसाहेब भोसले यांच्या वळूने 'चॅम्पियन'चा मान पटकविला. दरम्यान, केळीसांगवीचा धोडीबा बिन्नर यांच्या वळुला उपविजेता घोषीत करण्यात आले. राजूर ग्रामपंचायत व आदिवासी प्रकल्प कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने राजूरमध्ये डांगी जनावरांचे प्रदर्शन भरविले होते.

डांगी व संकरित जनावरांची पशु वैद्यकीय अधिकार्‍यांच्या समितीने आ. डॉ. किरण लहामटे, सरपंच पुष्पा निंगळे, उपसंरपच सतोष बनसोडे, माजी सरपंच गोकुळ कानकाटे, पशुधन अधिकारी डॉ.अशोक धिदळे, डॉ. राम जाधव, ग्रामपंचायत सदस्य राम लहामगे, अतुल पवार, राम बागर, ओमकार नवाळी, सारिका वालझाडे, संगीता जाधव,सगिता मैड, सुप्रिया रोकडे, रोहिणी माळवे, सगिता मोंहडुळे, आदींसह ग्रा. वि. अधिकारी राजेंद्र वर्पे, दत्तात्रय भोईर, अ‍ॅड दत्तात्रय निगळे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. डांगी आदत, दोन, चार, सहा, आठ दाती, बैल जोडी, डांगी कालवड, दुभती व गाभण गाय अशा जातीवंत व निवडक जनावरांची निवड करून बक्षीस दिले जाते. येथील डांगी जनावरांच्या प्रदर्शनामध्ये तब्बल लाख- सव्वा लाखावर जनावरे दाखल झाल्याने कोट्यवधी रुपयांची जनावरांची खरेदी-विक्री झाली.

राजूर ग्रामपंचायतीने जनावरांना पाणी व दिवाबत्तीची सुविधा दिली. शेती विषयक बी-बियाणे व पाले-भाज्यांच्या विविध जातींची कृषी विभागाकडून निवड करून शेतकर्‍यांना बक्षीस दिले जाते. प्रदर्शनात सहभागी जनावरे, हॉटेल, दुकाने, पाळणे, तमाशा फड मालकांकडून कर आकारला जातो. यामुळे ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळते. प्रदर्शनामध्ये डांगी गायींची किंमत सुमारे 90 हजार तर काही बैलांची किंमत तब्बल 3 लाखापर्यंत गेली, हे विशेष! अ.नगरसह ठाणे, नाशिक, धुळे, औरंगाबाद या जिल्ह्यांतुन मोठ्या प्रमाणात जनावरे व व्यापारी जनावरे खरेदीस आले होते.

प्रदर्शनामध्ये ईगतपुरी तालुक्यातील धामणीगावचे भाऊसाहेब भोसले यांंच्या वळूला चॅम्पियनचा मान मिळाला. रोख 11 हजार व ट्रॉफी तर केळीसांगवीचे धोडीबा बिन्नर यांच्या वळूला उप चॅम्पियन घोषित करण्यात आले. त्याला 7 हजार रुपये रोख व ट्रॉफी देण्यात येणार आहे. प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे खरेदी-विक्री करण्यात आली. राजूरचे स.पो.नि.प्रविण दातरेंसह 45 पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.

स्टॉल्सकडे बचत गटांसह शेतकर्‍यांची पाठ!
राजूरच्या डांगी जनावरांच्या प्रदर्शनामध्ये उभारलेल्या स्टॉल्सकडे बचत गटांसह शेतकर्‍यांनी पाठ फिरवल्याचे दिसले.

आ. डॉ. लहामटेंनी धरला ठेका!
आ. डॉ. किरण लहामटे यांना संगीताच्या तालावर ठेका धरलेल्या घोड्याचे नृत्य पाहण्याचा मोह आवरला आला नाही. चक्क घोडेस्वारी करीत फेरफटका मारून संकरीत जनावरांच्या निवड प्रक्रियेत त्यांनी सहभाग घेत 'चॅम्पियन' निवड प्रकिया पुर्ण करुन, सर्वांचे लक्ष वेधले.

कर न आकारण्याचा ऐतिहासिक निर्णय
कोरोना व लम्पि आजारामुळे राजूरच्या डांगी व संकरित जनावरांची प्रदर्शनामध्ये खरेदी- विक्रीस आलेल्या शेतकर्‍यांना जनावरांसाठी मोफत सोयी- सुविधा उपलब्ध करून देत कर आकारणी न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने शेतकर्‍यांनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news