नगर : पुढारी वृत्तसेवा : व्यापार्याच्या दुकानातील दहा लाखांची रोकड बँकेत भरण्यासाठी घेऊन गेलेला कर्मचार्याने पैसे घेऊन पोबारा केला होता. ही घटना मंगळवारी घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासांच्या आत मोहोळ (जि. सोलापूर) येथील बसस्थानकावरून त्याला जेरबंद केले. त्यांच्याकडून 9 लाख 41 हजारांची रोकड हस्तगत केली. सुशील प्रकाश बिरादार (वय 29, रा. वाणीनगर, पाईपलाईन रोड, मूळ रा. बिदर, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. प्रताप प्रेमचंद इर्दवानी (रा. सुरभी हॉस्पिटल समोर, गुलमोहोर रोड) यांचे महाराष्ट्र ट्रेडर्स नावाचे दुकाने आहे. त्याच्या दुकानामध्ये काम करणारा सुशील बिरादार यांच्याकडे बँक खात्यामध्ये भरण्यासाठी 10 लाख रुपये दिले होते. सुशीलने रोकड बँकेत न भरता रक्कम घेऊन पळून गेला.
याबाबत इर्दवानी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी एलसीबीला तत्काळ तपासाच्या सूचना केल्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस हेडकॉन्स्टेबल संदीप पवार, रवींद्र कर्डिले, भीमराज खर्से, फुरकान शेख, संतोष खैरे, अमृत आढाव, प्रशांत राठोड यांचे पथक तपासासाठी रवाना केले. पथक आरोपीच्या शोधासाठी बिदर (कर्नाटक) येथे निघाले. त्या वेळी आरोपी मोहोळ (जि. सोलापूर) येथे बसस्थानकावर थांबल्याचे समजले. पथकाने मोहोळ पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांची मदत घेऊन त्याला पकडले. त्याच्याकडून 9 लाख 41 हजार रुपये व मोबाईल जप्त करण्यात आले.