अकोलेत 8 स्टोन क्रेशर खाणपट्ट्यांना सील

अकोलेत 8 स्टोन क्रेशर खाणपट्ट्यांना सील

अकोले : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील 11 पैकी तब्बल 8 स्टोन क्रेशर व खाणपट्टा धारकांची खाणपट्ट्यांची मुदत संपल्याने ते सील केल्याची माहिती तहसीलदार सतीश थेटे यांनी दिली. दरम्यान (दि. 17 ऑक्टोबर 2022) अखेर मुदत देवूनही खाण पट्टे सुरुच असल्याने थेट कारवाई करण्यात आली आहे. अकोले तालुक्यात एकूण 11 दीर्घ मुदतीचे खाणपट्टे आहेत. यापैकी 8 खाणपट्ट्यांची मुदत संपली आहे. (दि. 17 ऑक्टोबर 2022) अखेर 3 खाणपट्टे सुरु आहेत. मुदत संपलेल्या व पर्यावरण अनुमती नसलेल्या दगडखाणी बंद करण्याची कारवाई करण्यासाठी संबंधित मंडलाधिकारी व तलाठी यांनी खाणपट्ट्यांच्या ठिकाणी भेट देवून खाणपट्टा, क्रेशर सील असल्याची खात्री केली.

दरम्यान, त्या ठिकाणी किती ब्रास खडी क्रश (सॅन्ड) आहे, याचा अहवाल सादर करावा. संबंधित मंडलाधिकारी, तलाठी यांनी मुख्यालयी राहून खाणपट्टा, क्रेशरची वेळोवेळी तपासणी करुन मुदत संपलेल्या खाणपट्ट्यातून उत्खनन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. आपल्या कार्यक्षेत्रात वाहतूक पास व इ.टी.पी जनरेट झाल्याशिवाय गौणखनिजाची वाहतूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. विना परवानगी, विना वाहतूक पास असलेले वाहन खाणपट्टा सील न केल्याचे आढळल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असे महसूल विभागाच्या आदेशात म्हटले आहे.

अकोले तालुक्यात मुदत संपलेले स्टोन क्रेशर व खाणपट्टा धारक किसन बबन महाले, मनोज ज्ञानेश्वर शिंदे, दत्तात्रय धोंडीबा शेळके, नामदेव निवृत्ती कुटे (सर्व बेलापूर), शरद मनोहर रत्नपारखी (वाशेरे), जगन्नाथ वसंत देशमुख (देवठाण), सचिन किसन सदगीर (कोंभाळणे), बाळासाहेब यशवंत आरोटे (जामगाव) असे 8 स्टोन क्रेशर व खाणपट्टा धारक आहेत. मा. राष्ट्रीय हरीत लवाद, नवी दिल्ली लवाद यांच्या आदेशानुसार पर्यावरण मान्यतेशिवाय गौणखनिजाचे अवैध उत्खनन करण्यात येऊ नये, असे पत्र स्टोन क्रेशर व खाणपट्टा धारकांना देण्यात आले आहे.

अकोले तालुक्यातील अकोले, विरगाव, समशेरपूर, शेंडी, ब्राम्हणवाडा, राजुर आदी परिसरात गौणखनिज वाहतूक करताना महाखनिज प्रणालीचा वापर करणे, गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणार्‍या वाहनांना 'जीपीएस' बसविणे बंधनकारक आहे. तसेच, मुदत संपलेले खाणपट्टे सील करण्यात आले आहेत.
                                                    – सतीश थेटे, तहसीलदार, अकोले

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news