

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरातील गंगामाई घाटावरील प्रवरा नदीपात्रात अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथून इंजिनिअयरिंग च्या दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी आलेल्या दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर एकास परिसरातील नागरिकांनी नदीच्या पात्रात बुडताना वाचविले असल्याची घटना सोमवारी (दि.५) सायंकाळी साडेसहावाजेच्या सुमारास घडली.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथील रहिवासी असणारा निलेश माधव अस्वले (वय १९) आणि त्याचा मित्र अमोल उत्तम घाणे (२१) तसेच युवराज नवनाथ धुमाळ हे तिघे जण इंजिनिअरिंगचे कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी अकोल्याहून संग मनेरला आले होते. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ते तिघेही मित्र संगमनेर शहरातील गंगामाई घाटावरील प्रवरा नदी पात्रामध्ये पोहोण्यासाठी गेले होते.
मात्र, निलेश अस्वले व अमोल घाणे हे दोघे ही गंगामाई घाटावरील प्रवरा नदी पात्रातील पाण्यात बुडाले आणि तिसरा बुडत असताना परिसरातील नागरिकांनी त्याला वाचविले. प्रशासन आणि पोहणाऱ्या तरुणांच्या मदतीने या दोघांचे ही मृतदेह प्रवरा नदी पात्रातून बाहेर काढण्यात आले त्यांना घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्या दोघेही तरुणांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यानंतर संगमनेर नगरपालिकेच्या कुटीर रुग्णाल यात त्या दोघाही तरुणांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत मयत निलेश अस्वले याचे वडील माधव अस्वले यांनी संगमनेर शहर पोलि सात दिलेल्या खबरीवरून संगमनेर शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.