

अकोले, पुढारी वृत्तसेवा: महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल अंबड येथील गवनेर दामू सरोदे याच्यावर कारवाई करण्यासाठी सामाजिक संघटना, नेते, कार्त्यकर्ते, आंबड ग्रामस्थांसह अकोलेकरांनी आज (दि. १७) कोल्हार - घोटी मार्गावर रास्ता रोको केला. यावेळी टायर जाळून निषेध व्यक्त करत सरोदे यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणी अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदिप कडलग, शिवसेनेचे उपप्रमुख महेश नवले, मनसे अध्यक्ष दत्ता नवले, बाळचंद्र भोर, रोहिदास जाधव, रामदास भोर, बाळासाहेब जाधव आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरोदे हा आंबड गावचा रहिवासी असल्याने आंबड येथील ग्रामस्थांनी सभा घेऊन जाहीर निषेध व्यक्त केला. तसेच सरपंच सुरेखा हासे, उपसरपंच प्रमोद भोर, नरेंद्र भोर आणि ग्रामस्थांनी कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
सरोदे याचा रिपब्लिकन पार्टी व आंबेडकरवादी समुदायाच्या वतीने निषेध व्यक्त करून कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टीचे राज्य सचिव विजयराव वाकचौरे यांनी केली.
हा प्रकार निंदनीय आहे. सरोदे याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत. त्याला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करू, असे आश्वासन पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी ग्रामस्थांना दिले.