

ओतूर: जीवघेण्या अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर अद्यापही अपघातांची मालिका सुरू असून शनिवारी (दि. १५) उदापूर (ता. जुन्नर) गावाजवळ पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहन आणि मोटार सायकलच्या धडकेत दुचाकीस्वार सागर शिंदे हा जागीच ठार झाला. तर याच गावाजवळ सायंकाळी ६ च्या सुमारास पीकअप टेम्पो व मोटार सायकल या दोन वाहनांमध्ये जोरदार धडक होऊन मोटार सायकलस्वार सोमनाथ बांगर हे जागेवरच गतप्राण झाले आहेत.
तसेच खामुंडी (ता. जुन्नर) येथील सह्याद्री पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल व आणि कार या तिहेरी अपघातात अमोल भले व राहुल डामसे हे दोन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती ओतूर पोलिसांनी दिली.
दरम्यान हे तीनही अपघात एकाच दिवशी वेगवेगळ्या वेळेत घडले असून केवळ दहा किलोमीटरच्या अंतरात घडले आहेत. या मार्गावर नित्य घडणारे अपघात व अपघातात बळी जाणाऱ्यांची गत काळातील संख्या पहाता ही एक गंभीर बाब बनली असून हा महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनल्याचे स्पष्ट झाले आहे, परिणामी या मार्गावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात अशी गावागावातून मागणी होऊ लागली आहे.