

नेवासा: पुढारी वृत्तसेवा : नेवासा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू झाल्याने गेल्या 7-8 वर्षात न्यायालयीन कामकाजाची व्याप्ती आणि विस्तार वाढला आहे. त्यामुळे न्यायालयाला सध्याच्या इमारतीत जागा कमी पडत होती. ही अडचण दूर करण्यासाठी जिल्हा न्यायालयाला नवीन इमारत व्हावी अशी वकील संघाची मागणी होती. म्हणून नवीन इमारतीसाठी आपण केलेल्या प्रयत्नाला यश आले असून आता जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 37 कोटी 57 लाख खर्चास शासनाकडून काल गुरुवारी प्रशासकीय मान्यता मिळाली असून न्यायाधीश निवासस्थान बांधकामाचे 5 कोटी 91 लाख खर्चाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आ.शंकरराव गडाख यांनी दिली.
दहा वर्षांपूर्वी नेवासा येथे 3 कनिष्ठ 1 वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय कार्यरत होते. मात्र अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय नसल्याने त्यासाठी नेवासा येथील वकील व पक्षकारांना सुरुवातीला नगरला व त्यानंतर श्रीरामपूरला झालेल्या जिल्हा सत्र न्यायालयात जावे लागत होते. श्रीरामपूरच्या न्यायालयात एकट्या नेवासे तालुक्यातील 70 टक्के कामे असल्याने वकील वर्ग व पक्षकरांची नेवाशाला स्वतंत्र न्यायालयाची आग्रही मागणी होती. त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले होते व 2014 मध्ये नेवाशाला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर झाले होते. त्यासाठी इमारत नसल्याने सुरुवातीला ते पाक शाळेजवळील इमारतीत कार्यान्वित केले व त्यानंतर न्यायालयाच्या सध्याच्या इमारतीत ते आणले. मात्र पुरेशा जागी अभावी न्यायालयीन कर्मचारी, वकील व पक्षकार सर्वांना जागेअभावी अडचण निर्माण झाली होती. आता नवीन इमारतीला मंजूरी मिळाल्याने हे अडचण दूर होणार असल्याचे आमदार गडाख यांनी सांगितले.
नेवासा येथील न्यायालयाच्या सध्याच्या इमारतीत न्यायालयीन कामकाजाचा व्याप वाढला आहे. सध्या 4 कनिष्ठ दिवाणी व वरिष्ठ 2 न्यायालय कार्यरत आहेत. न्यायालयाची संख्या वाढली असून त्याच इमारतीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय भरवले जात आहे. कोर्ट हॉलही लहान आहेत. त्यामुळे न्यायालयीन कामकाज व कार्यालयीन कामकाज करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. न्यायालयीन कामकाजाचे दप्तर ठेवण्यापासून कर्मचार्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते.
पक्षकारांची सुद्धा गैरसोय होते. जास्त गर्दी झाल्यामुळे बाहेर त्यांना तिष्टत उभे राहावे लागते. कोर्ट हॉल लहान असल्याने वकिलांना बसण्याची पण गैरसोय होते. या सर्व अडचणी दूर होऊन नवीन इमारतीमध्ये आता प्रशस्त कोर्ट हॉल व कार्यालय होणार असल्याने वकील, पक्षकार व कर्मचार्यांची अडचण दूर होणार आहे. नवीन इमारतीत न्यायालयीन इमारत, अंतर्गत रस्ते, वाहन पार्किंग, लँड स्केपिंग, पाणीपुरवठा, स्वच्छतागृह, वॉल कंपौड इत्यादी सोयी सुविधा होणार असून जिल्हा न्यायालयाचे नवीन इमारतीमुळे नेवासा शहराचे वैभवातही भर पडणार असल्याचे ते म्हणाले.
आ.शंकरराव गडाख यांनी विशेष प्रयत्नपूर्वक पाठवपुरावा केल्यानेच नेवासा येथे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीस निधी मंजूर झाला आहे. सदर काम मार्गी लागावे यासाठी आमदार गडाख यांनी पाठपुरवा करून इमारतीचा प्रश्न मार्गी लावला
याबद्दल नेवासा तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड.बन्सी सातपुते, मा.अध्यक्ष अॅड.वसंतराव नवले व वकील संघाचे सदस्य, वकील मंडळी आदींनी आ.शंकरराव गडाख यांचे आभार मानले आहेत.