

नगर; पुढारी वृत्तसेवा: पाथर्डी व नगर तालुक्यात दिवसाढवळ्या घरफोड्या करणार्या सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. नगर-औरंगाबाद रोडवरील जेऊर टोलनाक्यावरून पथकाने आरोपीला ताब्यात घेतले असून, तब्बल अकरा लाखांचे 21 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
तालुक्यातील नारायणडोह येथील कल्पना विलास साठे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून दि.1 जुलै रोजी दुपारच्या सुमारास चोरट्यांनी एक लाख 62 हजार रूपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. हा गुन्हा गुंड्या काळे व त्याच्या साथीदारांनी केला असून, चोरीचे दागिने विकण्यासाठी मोटार सायकलवरून औरंगाबाद रोडने नगरकडे येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जेऊर टोलनाक्यावर सापळा लावून थांबले. पोलिसांची चाहूल लागताच मोटार सायकलवर मागे बसलेला डोंगराच्या दिशेने पळून गेला. पोलिसांनी स्वरूप ऊर्फ गुंड्याद काळे (वय 25, रा. अंतापूर शिवार, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत कापडी पिशवीत ठेवलेले सोन्याचे दागिने मिळून आले. त्याच्यावर पाथर्डी व नगर तालुका पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल असून औरंगाबाद जिल्ह्यातही दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.