

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर – औरंगाबाद महामार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झाली. रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी आंदोलन करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. नगर – औरंगाबाद महामार्ग रहदारी असणारा मार्ग आहे. शनिशिंगणापूर, देवगड देवस्थानला दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्याही मोठी आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत.
खड्ड्यांनी पाणी साचल्यानंतर वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. तसेच, खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात घडतात. अपघातात अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या मार्गावरील वाहनांचा वेग जास्त असतो. महामार्गा लगत असणार्या शेंडी, जेऊर, पांढरीपूल घोडेगाव गावांनी चौक व पायी, दुचाकी चालकांची नेहमीच वर्दळ असते, अशा ठिकाणी अपघातांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. पाऊस सुरू असल्याने माती मुरूम टाकून खड्डे बुजविण्यात येत आहेत. शिवाय खड्डे बुजविण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, बुजविलेले खड्डे दोनच दिवसात उखडून जात आहेत. खड्ड्यांनी गाडी आढळून अनेक वाहनांचे टायर फुटून वाहन चालकांचे देखील नुकसान होत आहे.
नगर- औरंगाबाद महामार्गाने शाळेत सायकलवर जाणार्या विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. दुचाकीस्वार, मोठ्या वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते. या महामार्गाची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय डोकडे यांनी दिला.