

राहुरी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : राहुरी शहर हद्दीत पुन्हा 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अपहरण केल्याची घटना 4 मे रोजी रात्रीच्या दरम्यान उघडकीस आली. राहुरी शहर हद्दीतील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबियांसह राहते. ( दि. 4 मे) रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास ती व घरातील सदस्य जेवण करुन झोपले होते. रात्री 12.30 वाजेच्या सुमारास वडील लघुशंकेसाठी उठले असता मुलगी घरातून गायब झाल्याचे दिसले. परिसरात तिचा शोध घेतला, मात्र ती मिळुन आली नाही. मुलीला अज्ञात तरूणाने अज्ञात कारणाकरीता पळवुन नेले असावे, अशी खात्री झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी अज्ञात तरूणाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यातील सोनगाव, गुहा, केंदळ, टाकळीमियॉ, वळण व राहुरी शहर भागात मुलींना पळवून नेल्याच्या व पळून जाण्याच्या तब्लबल 6 घटना उघडकीस आल्या. यामुळे पालक वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनांमध्ये अल्पवयीनपासून 42 वर्षीय महिलांचा समावेश आहे. ही बाब चिंताजनक आहे. या घटनांना जबाबदार कोण, याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.