वाळकी : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदअंतर्गत नगर तालुक्यातील निंबळक प्राथमिक शाळेत शालेय शिक्षण, क्रीडा विभाग, मुंबई व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या निर्देशानुसार शाळा सुरक्षा कार्यक्रमांतर्गत मॉकड्रिलचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणार्थी नोडल शिक्षक राजेंद्र निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्ह्यांमधील प्रत्येकी एक अशा 34 आदर्श शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे आयोजन करण्यात आले. प्रथम विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट करून मॉकड्रिलमध्ये सामील झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना धोक्याचा सायरन देऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाची सुरुवात झाली. दोन्ही खोल्यांमधील विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मदतीने डोक्यावर दप्तर घेऊन मैदानावर सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले.
मात्र, वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांची संख्या मोजल्यानंतर काही विद्यार्थी हे कमी आढळले. संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदत बचाव गटाद्वारा सर्व जखमी विद्यार्थ्यांना योग्य शास्त्रीय पद्धतीने मैदानात आणून त्वरित उपस्थित केले. आरोग्य विभागाचे डॉक्टर व शिक्षकांच्या मदतीने प्रथमोपचार पेटीच्या मदतीने प्रथमोपचार करण्यात आले. काही गंभीर जखमी विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी तपासणीनंतर सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. अग्निशमन दलाने विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका करण्यासाठीची विविध थरारक प्रात्यक्षिके दाखविली.
आपत्ती व्यवस्थापन -कार्यक्रमातील सुसज्ज यंत्रणा व उत्कृष्ट सादरीकरण पाहून विद्यार्थ्यांसह उपस्थित ग्रामस्थही आश्चर्यचकित झाले. या मॉकड्रिलसाठी होमगार्डचे पलटण अधिकारी संजय शिवदे, होमगार्ड तालुका समादेशक माधव हरवणे, आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष बागले, डॉ. प्रशांत नांगरे, डॉ. दीपिका गाडे, भाऊसाहेब बनगे, सुरेश दळवी, अग्निशमन कर्मचारी बाळासाहेब घाटविसावे, जिल्हा परिषद निरीक्षक जबीन शेख, सुचिता टकले आदींसह पंचायत समितीचे उपसभापती डॉ. दिलीप पवार, सरपंच प्रियांका लामखडे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरक्षनाथ कोतकर, दत्तात्रय कोतकर, दत्तू दिवटे, बी. डी. कोतकर, प्रभारी मुख्याध्यापक सुखदेव पालवे, नोडल प्रशिक्षणार्थी शिक्षक राजेंद्र निमसे, शरद जाधव, दत्तात्रय जाधव, भागचंद सातपुते, विशाल कुलट, कल्पना शिंदे, अर्चना जाचक, अलका कांडेकर, सुनीता रणदिवे, सुजाता किंबहुने, प्रज्ञा हापसे, शैला सरोदे आदी उपस्थित होते. हा शाळा सुरक्षा कार्यक्रमांतर्गत मॉकड्रिलचे प्रात्यक्षिक यशस्वीपणे सादरीकरण केल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, हिंगणगाव केंद्रप्रमुख बाळासाहेब दळवी आदींनी निंबळक शाळेचे अभिनंदन केले. प्रशिक्षणार्थी नोडल शिक्षक राजेंद्र निमसे यांनी प्रास्ताविक केले. दत्तात्रय जाधव यांनी सूत्रसंचालन केले. भागचंद सातपुते यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांना बचावाचे धडे
मॉकड्रिलसाठी जिल्ह्यातून एकमेव निंबळकच्या प्राथमिक शाळेची निवड करण्यात आली. प्रात्यक्षिक मॉकड्रिलचा एकमेव उद्देश म्हणजे अचानक येणार्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीपासून शालेय विद्यार्थी स्वतःचा व इतरांचाही बचाव कसा करू शकेल याबाबतचे वस्तुस्थितीदर्शक प्रात्यक्षिक करून घेणे होता. या मॉकड्रिलसाठी भूकंप हा विषय घेऊन प्रात्यक्षिकाचे नियोजन केले होते.