संगमनेर : मेंढपाळ महिलेने पालावर उभारली गुढी

संगमनेर : मेंढपाळ महिलेने पालावर उभारली गुढी

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : एका बाजूला सर्व हिंदूधर्मीय समाज बांधव आपल्या घरासमोर गुढ्या उभारून गुढीपाडव्याचा सण धुमधडाक्यात साजरा करून नवीन वर्षाचे स्वागत करत होते. तर दुसरीकडे अठरा विश्वे दारिद्र्य कायम पाचवीला पूजलेल्या एका मेंढपाळ महिलेने आपल्या मेंढ्यांच्या वाघोरीच्या बाहेर थाटलेल्या पालावर गुढी उभारून नवीन वर्षाचे अशाही परिस्थितीत स्वागत केले.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकुर नजीकच्या जांभूळवाडी गावामध्ये एकदा उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की, पिण्याच्या पाण्याची पंचायत असते. तर जनावरांना आणि मेंढ्यांना पाणी व चारा आणायचा तरी कुठून, असा यक्षप्रश्न खेमनर कुटुंबियांसमोर पडतो. त्यामुळे या मेंढ्यांना चारापाण्यासाठी वनवनभटकंती करण्याची वेळ प्रत्येक वर्षी येत असते.

याही वर्षी खेमनर कुटुंबीय आपल्या100 ते125मेंढ्या घेऊन ज्या गावात चारापाणी मिळेल, त्या गावात भटकंती करू लागले. भटकंती करत करत हे कुटुंबीय संगमनेर शहरा नजीकच्या प्रवरा नदीच्या कडेला असणार्‍या गंगामाई घाटाजवळील एका शेतात पाल टाकून तिथेच मेंढ्यांची वाघुर पण टाकली.

गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी विजय नागरी पतसंस्थेचे अनिरुद्ध उपा सनी हे सकाळी गंगामाई घाट परिसरात फिरण्यास गेले असता त्यांना एका शेतात मेंढ्यांची वाघुर आणि पालासमोर गुढी उभारून पालाच्या समोरच एक मेंढपाळ महिला स्वयंपाक करत असल्याचे निदर्शनास पडले. त्यांनी त्या पालावर जाऊन त्या महिलेची आस्थेने विचारपूस केली असता तेव्हा ती महिला म्हणाली की, मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला होत असते. आम्ही प्रत्येक वर्षी आमच्या घरी गुढ्या उभारून गुढी पाडवा करतो. तसाच गुढी पाडवा या पालावरही साजरा करण्यात मला खूप आनंद वाटत असल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news