श्रीरामपूर : स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल

श्रीरामपूर : स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील एकलहरे येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानदाराचे नाव एस. के. म्हस्के असे आहे. येथील पुरवठा निरीक्षक सुहास उत्तम पुजारी यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. स्वस्त धान्य दुकानातील 15 तांदळाच्या गोण्या दुकानाबाहेर आढळून आल्या होत्या. या गोण्यांवर शासकीय शिक्का नव्हता. या गोण्या दुकानातील असून त्या काळ्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जात होत्या. असा दावा ग्रामस्थांनी केला. ग्रामस्थांनी दुकान चालकास धारेवर धरले होते.

दुकानाला टाळे ठोकण्यात आले. ग्रामस्थांनी या प्रकाराची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांना दिली. त्यानंतर तहसीलदारांच्या आदेशावरून दुकानातील विक्री झालेला माल व शिल्लक साठा यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये आवश्यकतेपेक्षा कमी साठा आढळून आला. दुकानातील मालाची बाहेर विक्री केली जात होती, असा संशय पुरवठा विभागाला आला.

त्यानंतर शहर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. हवालदार अतुल लोटके, पोलिस नाईक राशीनकर यांनी गोण्या पोलिस ठाण्यात आणत पंचनामा केला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे हे अधिक तपास करीत आहेत. नुकताच शेवगाव तालुक्यात रेशनचा तांदूळ सापडला. आता श्रीरामपुरात हा प्रकार घडलेला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news