नगरपंचायत निवडणूक : रोहित पवारांचा भाजपला धक्का, तर लंकेंकडून शिवसेनेला खिंडार!

नगरपंचायत निवडणूक : रोहित पवारांचा भाजपला धक्का, तर लंकेंकडून शिवसेनेला खिंडार!
Published on
Updated on

अहमदनगर; गोरक्षनाथ शेजूळ

कर्जत आणि पारनेर नगरपंचायतींच्या निवडणुकांना राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कर्जतमध्ये आ. रोहित पवारांची संभाव्य 'चाल' ओळखून माजी मंत्री राम शिंदेंनी आपल्या उमेदवारांना अज्ञातवासात हलवून सावध पावित्रा घेतला होता. परंतु, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आमदार पवारांनी टाकलेल्या डावपेचांमुळे शिंदेच्या निगराणीतूनही भाजपच्या विद्यमान नगरेसविका, पदाधिकारी आणि काहींनी तडकाफडकी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले.

या घडामोडीत राष्ट्रवादीची एक जागा बिनविरोध काढत पवारांनी शिंदेंना मोठा धक्का दिला. तर, पारनेरमध्येही आमदार निलेश लंकेंनी अनेक शिवसैनिकांचे राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणत, निवडणुकीपूर्वीच विजय औटींना काहीसे चिंतेत टाकले. मात्र, शिंदे आणि औटींना असलेला राजकीय अनुभव, प्रचारातील जिव्हाळ्याचे मुद्दे, नाराजीचा फायदा उचलण्याचे अवगत तंत्र, हे सर्व लक्षात घेवून ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

कर्जत-जामखेडमध्ये गेल्या पाच वर्षांपूर्वी प्रा. राम शिंदेंजवळ आमदारकी आणि मंत्रिपदही होते. त्यामुळे कर्जत नगरपंचायतींची सत्ता मिळवणे त्यांना काहीसे सोपे झाले होते. मात्र, या पाच वर्षात समिकरणे बदलली. शिंदेंकडे आज आमदारकीही राहिलेली नाही. शिवाय, शिंदेंकडे असलेल्या ग्रामपंचायती, विविध सहकारी संस्थादेखील आ. पवारांनी 'लक्ष्य' करत त्या काबीज केल्या. त्यात प्रसंगी कुठं फोडाफोडीचे राजकारण, तर कुठं तडजोडीचे समिकरणे आखून त्यांनी शिंदे आणि भाजपला राजकीय खिंडार पाडले.

आता नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी निवडणूक सुरू आहे. त्यातही, त्यांनी काही जागा बिनविरोध काढण्याचा मास्टर प्लॅन केला होता. परंतु, त्याचा सुगावा लागल्याने माजी मंत्री शिंदेंनी अर्ज दाखल केल्यानंतर तत्काळ आपले संभाव्य उमेदवार अज्ञातस्थळी हलविले. मात्र, आ. पवारांचे शिंदेंच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष असल्याने काल अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या काही पदाधिकार्‍यांनी तसेच दिग्गज उमेदवार म्हणून संबोधल्या जाणार्‍यांनी आपले उमेदवारी अर्ज अचानक मागे घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीची एक जागा बिनविरोध झाली, तर काही ठिकाणी डमी उमेदवारांना भाजपचा ए. बी. फॉर्म देण्याची वेळ येवून ठेपली आहे.

परंतु, शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे ही निवडणूक सोडणार नाहीत. अर्ज माघारीवेळी भाजपच्या इच्छुकांवर आमदार पवारांनी वापरलेले दबावतंत्र, त्यासाठी केलेली दहशत, याचा एक मुद्दाच बनवून शिंदेंनी तसा प्रचारही सुरू केला. यासाठी मौन आंदोलनातून त्यांनी जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय, नाराजांनाही त्यांनी जवळ करण्याचे नियोजन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीचं, असा संकल्प त्यांनी केला आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्षपद असल्याने पक्षातील आपले राजकीय स्थान उंचाविण्यासाठी ही निवडणूक जिंकणे त्यांना महत्वाची आहे.

पारनेरमध्येही पाच वर्षांपूर्वीचे चित्र वेगळे होते. येथे विजय औटींकडे आमदारकी होती. सोबत संभाव्य मंत्रिपदाच्या शर्यतीत नावही होते. शिवाय, नीलेश लंकेही त्यावेळी शिवसेनेसोबत होते. त्यामुळे पारनेर नगरपरिषदेवर भगवा फडकवणे, औटींना सोपे झाले होते. परंतु, आज चित्र वेगळे आहे. औटींची आमदारकी गेलेली आहे, नीलेश लंके हे राष्ट्रवादीकडून आमदार आहेत. त्यामुळे औटींसाठी आणि शिवसेनेसाठीही ही निवडणूक आव्हानात्मक आहे.

तर, आमदार लंकेंनी नगरपरिषद निवडणुकीपूर्वी शिवसेनेला येथे खिंडार पाडले आहे. शहरातील माजी सरपंच राजेंद्र तारडे यांच्यासह अनेक शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत आलेल्या नगरसेवकांना पुन्हा सेनेत जावे लागले होते. ते नगरसेवकदेखील आज लंकेंसोबत आहेत. त्यामुळे आमदार लंकेंनी पारनेर शहरात सुरू केलेले बेरजेचे राजकारण औटींसाठी डोकेदुखी ठरणार आहे. शिवाय, मुळा धरणातून 73 कोटींची पाणी योजनेचे राजकीय भांडवल फायदेशीर ठरणार आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादीकडून प्रत्येक प्रभागात सातपेक्षा अधिक इच्छुक होते. परंतु उमेदवारी एकाला मिळणार असल्याने राष्ट्रवादीतील नाराजी मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे.

याच नाराजीचा फायदा औटींना होणार आहे. शिवाय, आमदार लंकेंपेक्षा औटी हे शहरातील स्थायिक असल्याने त्यांना येथील प्रश्न माहिती आहेत. त्यामुळे लंकेंच्या रुपाने 'बाहेरचे आक्रमण थोपवा, असाही प्रचार सेनेकडून सुरू असल्याची चर्चा आहे. अर्ज माघारीनंतर राष्ट्रवादीतील नाराजी वाढणार आहे, त्याचा थेट फायदा हा शिवसेनेला अर्थात औटींना होईल, अशी सेनेला अपेक्षा आहे, तर तिसरी आघाडी कदाचित सेनेसोबत असती, तर ताकद वाढली असती, मात्र, तिसरा पर्याय म्हणून तिसरी आघाडी मैदानात उतरल्याने हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला जनतेसाठी एक पर्याय मिळाला आहे. त्यामुळे या आघाडीला जाणारी मते राष्ट्रवादीसाठी अप्रत्यक्ष जमेची ठरणार, असेही बोलले जाते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news