औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा
'आमच्या हिंदुत्वाचे मोजमाप घेऊ नका. हृदयात राम अन् हाताला काम, असे आमचे हिंदुत्व आहे. आम्ही रामभक्त असून, गदाधारीदेखील आहोत,' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी भाजपवर तोफ डागली. भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असाही घणाघाती हल्ला त्यांनी केला. भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांनी पैगंबरांवर केलेल्या वक्तव्यामुळे जगभरात देशाची अब्रू गेल्याची टीकाही त्यांनी केली.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या विराट सभेत ठाकरे यांची तोफ भाजपवर धडाडली. शस्त्रक्रियेच्या सहा महिन्यांनंतर मुंबईबाहेर पहिले पाऊल बाळासाहेब ठाकरे यांच्या लाडक्या शहरात टाकले असून, हिंदुत्व हा आमचा श्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जलआक्रोश मोर्चाचा संदर्भ देत काश्मिरी पंडितांची टिपून हत्या केली जात असून, त्यांचा आक्रोश कधी ऐकणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मर्द असाल तर काश्मिरी पंडितांचे रक्षण करा. हिंमत असेल तर काश्मिरात हनुमान चालिसा वाचा, असा सल्लाही त्यांनी दिला.
मुस्लिमांच्या प्रेषितांवर टीका करण्याची गरज नव्हती. मात्र, भाजपचे टिनपाट प्रवक्ते बरळत सुटले आहेत. अरब देशांनी भारताला माफी मागायला लावली. भाजपच्या प्रवक्त्यांमुळे देशावर नामुष्की ओढवली. मात्र, भाजप प्रवक्त्यांची भूमिका ही देशाची भूमिका ठरू शकत नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले.
बाबरी मशिदीचे पतन झाल्यानंतर सर्वजण जबाबदारी टाळत होते. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. अयोध्येतील राम मंदिराची उभारणी न्यायालयामुळे झाली. तुमच्यामुळे राम मंदिर झाले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 'जो हिंदू हित की बात करेगा, वहीं देश पे राज करेगा,' अशी घोषणा बाबरी आंदोलनाच्या वेळी दिली होती. तुम्ही हिंदूंचे कोणते हित जोपासताय, असा प्रश्न ठाकरे यांनी केला. प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका, ही सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलेली भूमिका योग्यच आहे; परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. आपली कार्टी वाया जात असतील, तर संघाने त्यांच्या कानाखाली आवाज काढावा, अशी भूमिकाही ठाकरे यांनी मांडली. डोक्यावर भगव्या टोप्या घातल्याने हिंदुत्व येत असेल, तर संघ काळ्या टोप्या का घालतो? असा सवाल त्यांनी केला.
देशात सशक्त विरोधी पक्ष हवा, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी मांडत आहेत. महाराष्ट्रात भाजप हा विरोधी पक्ष आहे. येथे सर्व काही व्यवस्थित सुरू असताना भाजप सुपारी देत आहे. कोणाचा भोंगा वाजतोय, तर कोणी हनुमान चालिसा वाचतोय, कोणी कोणाच्या थडग्यावर डोके टेकवतेय, असे नमूद करून ठाकरे यांनी राज ठाकरे, ओवैसी, राणा दाम्पत्यावर निशाणा साधला.