घनकचरा व्यवस्थापन करात दुप्पट वाढ : करवाढ रद्द करा; शिवसेनेची मागणी | पुढारी

घनकचरा व्यवस्थापन करात दुप्पट वाढ : करवाढ रद्द करा; शिवसेनेची मागणी

नगर : पुढारी वृत्तसेवा : घरपट्टीच्या बिलांमध्ये नमूद होणार्‍या घनकचरा व्यवस्थापन करात महापालिकेने दुप्पट दरवाढ केली असून, ही दरवाढ रद्द करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले. सर्वसाधारण मालमत्ता करामध्ये दहा टक्के सूट मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या वेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, गिरीश जाधव, योगीराज गाडे, संतोष गेनप्पा, सचिन शिंदे, परेश लोखंडे, अशोक दहिफळे, गौरव ढोणे, संजय आव्हाड, पप्पू भाले, विशाल वालकर, प्रशांत पाटील, सुरेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, की मनपाने चालू वर्षाच्या घरपट्टी बिलांमध्ये अवाजवी वाढ करत घनकचरा व्यवस्थापन कर दुपटीने वाढविला आहे. हा दर पूर्वी निवासी वापरासाठी 240 होता. तो आता 480 करण्यात आला आहे. तसेच व्यावसायिकांसाठी हा कर पूर्वी 1200 होता. तो आता 2400 रुपये करण्यात आला आहे. ही वाढीव कर आकारणी सर्वसामान्य, व्यापारी व दुकानदार यांना न परवडणारी व अन्यायकारक आहे. ती त्वरित रद्द करावी व पूर्वीप्रमाणे कर आकारणी करावी. शहरातील छोटे दुकानदार व मोठे व्यापारी यांना घनकचरा व्यवस्थापन कर सरसकट एकसारखा आकारण्यात येत असल्यामुळे छोट्या व्यावसायिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
तसेच कमी जागेत राहत असलेल्या रहिवासी व मोठ्या जागेत राहत असलेले रहिवासी यांनासुद्धा सरसकट एकसारखा कर आकारण्यात आला आहे. त्यामुळे गरीब जनतेत चीड निर्माण झाली आहे. तरी ही कर आकारणी चटई क्षेत्रफळाने व्हायला हवी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना पदाधिकार्‍यांनी दिला.

हेही वाचा

Back to top button