गर्भगिरीच्या डोंगररांगांत वन्य प्राण्यांचा मुक्त संचार!

गर्भगिरीच्या डोंगररांगांत वन्य प्राण्यांचा मुक्त संचार!

[author title="शशिकांत पवार" image="http://"][/author]

नगर तालुका : गर्भगिरीच्या डोंगररांगा निसर्गसंपत्तीने नटलेला असून, येथील निसर्ग नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन विभागातर्फे वन्य प्राण्यांच्या करण्यात आलेल्या पाहणीत हरीण व रानडुकरांची संख्या अधिक असल्याचे आढळून आले आहे. तसेच विविध वन्य प्राण्यांचा मुक्त संचार पाहावयास मिळाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्र प्रकाशात वन विभागातर्फे दरवर्षी जंगलामध्ये वन्य प्राण्यांची पाहणी व अभ्यास केला जातो. चालू वर्षी तालुक्यातील ढगाळ हवामानामुळे चंद्राचा प्रकाश कमी प्रमाणात होता. वन विभागाच्या पाहणीत तालुक्यात सर्वाधिक हरीण व रानडुकरांची संख्या आढळून आली आहे. त्याचबरोबर काळवीट, ससा, लांडगा, साळिंदर, जंगली मांजर, उदमांजर, कोल्हा, तरस, खोकड, मोर याशिवाय विविध जातींच्या पक्ष्यांचा संचार दिसून आला आहे.

बुद्ध पौर्णिमेला वन विभागाकडून पाहणी

बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्याजवळ वन विभागातर्फे वन्य प्राण्यांची पाहणी करण्यात येते. तसेच पदमार्ग, ठसे यावरून प्राण्यांचा संचार लक्षात येतो. तालुक्यात आठ गावांत वन्य प्राण्यांची पाहणी करण्यात आली. जेऊर येथे वनरक्षक मनेष जाधव, वनमित्र शशिकांत पवार, विद्यासागर पेटकर, डोंगरगण येथे वनरक्षक अमोल गोसावी, चांदबिबी महाल वनरक्षक ए. आर. खेडकर, वनरक्षक बी. एन. रणसिंग, व्ही. ए. चेमटे, एम. एस. इंगळे, ए. एम. गाडेकर, के. एम. गायकवाड यांनी उपवन संरक्षक सुवर्णा माने, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी केली.

तालुक्यातील बहुतांशी भागात गर्भगिरीच्या डोंगररांगा मोठ्या प्रमाणात गेलेल्या आहेत. वन विभागाचे सुमारे साडेसहा हजार हेक्टर वनक्षेत्र आहे. वनक्षेत्रात विविध दुर्मिळ औषधी वनस्पतींचा खजिना आढळून येतो. गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांचे वास्तव्यही आढळून आले आहे. उन्हाळ्यात वन्य प्राण्यांच्या पाण्याची सोय करण्यासाठी वन विभागातर्फे 18 पाणवठे बनविण्यात आले आहेत. नैसर्गिक पाणवठ्यांची संख्याही मोठी आहे.

पर्यटकांसाठी पर्वणी

गर्भगिरीच्या डोंगररांगांमध्ये वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असून, विविध जातीचे पक्षी स्वच्छंदपणे बागडताना दिसून येतात. रानडुकरांची असलेली जास्त संख्या शेतकर्‍यांसाठी चिंताजनक असली, तरी इतर प्राण्यांची संख्याही निसर्गप्रेमींसाठी आनंदाची बाब ठरत आहे. पावसाळ्यात डोंगरगण, इमामपूर, आगडगाव, गुंडेगाव, ससेवाडी, बहिरवाडी, रांजणी, तसेच जेऊर परिसर पर्यटकांसाठी पर्वणी ठरत असतो.

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या पाहणीत तालुक्यात हरीण व रानडुकरांची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर इतर वन्य प्राणी व विविध जातींच्या पक्षांचे वास्तव्य दिसून आले. वनांचे जतन व संवर्धन करण्यासाठी सर्व नागरिकांनी वन विभागाला सहकार्य करावे. – सुरेश राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी

तालुक्यात गर्भगिरीच्या डोंगररांगांत वन्य प्राण्यांसाठी पोषक वातावरण असल्याने येथे मोठ्या प्रमाणात मुक्त संचार आढळून येतो. सृष्टीचक्र सुरळीत चालण्यासाठी वने, तसेच वन्य प्राण्यांची गरज आहे. तालुका वन्य प्राण्यांसाठी नंदनवनच ठरत आहे.

– सुवर्णा माने, उपवन संरक्षक, नगर

चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती असताना वन विभाग, स्वयंसेवी संस्था, तसेच ग्रामस्थांनी वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केल्याने वन्य प्राण्यांचे स्थलांतर कमी प्रमाणात झाले. त्यामुळे कडक उन्हाळ्यातही डोंगररांगांनी वन्य प्राण्यांचा संचार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.

– दिनेश बेल्हेकर, उपसरपंच, जेऊर

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news