नगर तालुक्यातील 80 टक्के तलावांची घागर रिकामीच..!

नगर तालुक्यातील 80 टक्के तलावांची घागर रिकामीच..!

Published on

वाळकी(नगर) : पावसाळा मध्यांवर येऊन ठेपला तरीही नगर तालुक्यात जोरदार पाऊस झालेला नाही. पावसाने पाठ फिरविली असून, तालुक्यातील शेतकरी जोरदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. पावसाअभावी गावोगावचे पाण्याचे उद्भव कोरडे पडलेले आहेत. पावसाअभावी खरीपातील पिकांची वाट लागली आहे. बेसुमार पाणी उपाशामुळे तालुक्यातील 80 टक्के तलावांची घागर रिकामीच असून, 20 टक्के तलावातील पाण्याने तळ गाठला आहे.

नगर तालुक्यात उशीराने आगमण झालेल्या पावसामुळे खरीपातील मूग, उडीद पिकांची अनेक भागात पेर झाली नाही. जुलैच्या मध्यात झालेल्या पावसामुळे तालुक्यात खरीपातील बाजरी, मका, तूर, सोयाबीन, कपाशी पिकांची पेर वाढली. मात्र, पावसाने मागील 20 दिवसांपासून पाठ फिरविल्याने उगवण झालेल्या पिकांची वाढ खुंटली. अनेक ठिकाणी पाण्याअभावी पिकांनी माना टाकल्या आहेत. तालुक्यात सहा हजार 178 हेक्टर क्षेत्रावर बाजरीची पेर झाली असून, मका 3500, तूर 6527, मूग 6527, उडीद 1228, सोयाबीन 19554 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. पावसाने दगाफटका दिल्याने या पिकांची आशा मावळण्याची चिन्ह सध्या दिसत आहे.

मागील वर्षी झालेल्या पावसाने लघु पाटबंधारे असणारे वाळकी, गुणवडी, देऊळगाव, वडगाव तांदळी, कामरगाव, चिचोंडी पाटील, नारायण डोहो, भातोडी, कौडगाव, बारदरी, कापुरवाडी, पिंपळगाव माळवी तलाव तुडूंब भरले होते. त्याचबरोबर गावोगावचे पाझर तलाव, लहान मोठे बंधारे भरले होते. मात्र, बेसुमार पाणी उपशामुळे पाझर तलाव, बंधारे पूर्णपणे कोरडे पडले आहेत. भूगर्भातील पाणी पातळी खोल गेल्याने विहीरी, बोअरवेलमधील पाण्याने तळ गाठला आहे. पाण्याचे उद्भव कोरडे पडल्याने पाणी टंचाईचे संकट नागरिकांसमोर उभे ठाकले आहे. शेतकर्‍यांना ऐन पावसाळ्यातली चारा टंचाईचा सामना करण्याची वेळ ओढावली आहे.

तलावातील अतिक्रमणाने गाळमुक्तीला अडथळे

शासनाने गाळमुक्त तलाव योजना राबवून तलावातील जलसाठा वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तालुक्यातील अनेक तलावात मोठ्याप्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. तलावात विहीरींचे अतिक्रमण, शेतजमीन तयार करत अतिक्रमण झाल्याने गाळ काढण्यास स्थानिक अतिक्रमण धारकांनी अडकाठी निर्माण केली. अतिक्रमण धारकांच्या अरेरावीला अधिकारी बळी पडल्याने गाळमुक्त तलाव योजना अनेक ठिकाणी बारगळली.

पाणी टंचाईचे बसतात चटके

तालुक्यातील 80 टक्के तलाव रिकामे झाले असून, 20 टक्के तलावात ऐवळ 20 ते 40 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. यावर्षी तालुक्यात अद्यापही जोरदार व समाधानकारक पाऊस झालेला नाही. तलाव कोरडे असल्याने अनेक गावांतील स्थानिक पाणी योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.काही गावांमध्ये पाणी टंचाईचे चटके बसू लागले आहेत. पावसा अभावी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

तालुक्यात पाण्याचा बेसुमार उपसा

दोन तीन वर्षांपासून पर्जन्यमान चांगले होत असल्याने दरवर्षी तलाव पूर्ण क्षमतेने भरत होते. त्यातून गावचा पाणी प्रश्न सुटत होता. मात्र, तलावातून शेतीसाठी अनाधिकृतपणे पाणी उपसा वाढल्याने तलाव कोरडे पडले. यामुळे वर्षी अनेक गावांना पाणी टंचाईची सोसावी लागत आहे. पाणी उपसा करणार्‍यांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने ते निर्ढावले आहेत.

अतिक्रमणाला आवर घालणार कोण?

तालुक्यातील अनेक तलावात अतिक्रमण वाढले आहे. तलाव क्षेत्रात विहीरी खोदून पाणी पळवणे, तलावात शेतजमिनी तयार करणे असले प्रकार सर्रासपणे वाढले. मतांच्या बेरजेमुळे स्थानिक सत्ताधारी अतिक्रमण धारकांवर कारवाईस टाळाटाळ करत आहेत. तर, अधिकारीही अतिक्रमण धारकांच्या दंडेलशाहीकडे दुर्लक्ष करत आहेत. ही अतिक्रमणे कोणी आवरायची?

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news