लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिवरेबाजार ग्रामसभेचा ‘हा’ मोठा निर्णय..! | पुढारी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिवरेबाजार ग्रामसभेचा 'हा' मोठा निर्णय..!

टाकळी खातगाव : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरू असून पारनेर-नगर मतदारसंघातील हिवरेबाजार या निवडणुकीतही आपल्या गावाची परंपरा जपणार आहे. या गावात कोणालाही मतदानाची सक्ती केली जात नसून कोणत्याही पक्षाचा पोलिंग एजंट न देता गावकरीच उमेदवाराच्या सल्ल्याने पोलिंग एजंटची नियुक्ती करतात. हिवरेबाजार ग्रामस्थांच्या वतीने विविध राजकीय पक्षांना आवाहन करण्यात आले असून, कोणत्याही मतदाराला मतदानाची सक्ती करण्यात येणार नाही, तसेच परंपरेप्रमाणे मतदानाच्या वेळी गावकरीच पोलिंग एजंट देणार आहेत. गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या ग्रामस्थ सभेत याबाबत चर्चा करण्यात आली. मतदारांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार असून आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करण्यात येणार आहे.

हिवरे बाजारच्या 500 ते 1000 मतांचा कोणत्याही पक्षाच्या उमेदवारास फारसा फरक पडत नाही. हिवरेबाजार ग्रामस्थांच्या प्रामाणिक प्रयत्नातून तसेच गावाला प्रामाणिकपणे सहकार्य करणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते, प्रशासन पत्रकार यांच्यामुळे हिवरेबाजार पाहण्यासाठी दररोज राज्यातून, देशातून मोठ्या प्रमाणावर अभ्यास सहली येतात. त्यामुळे हिवरेबाजार हे ग्रामविकासाचे प्रेरणास्थान झाले आहे.
सन 1990 पासून प्रत्येक निवडणुकीत सर्व ग्रामस्थ एकत्र बसून कुठलीही सक्ती न करता कोणाच्याही आमिषाला बळी न पडता 90 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान घडवून आणत आहेत. पूर्वी सर्व मतदानाची एकत्र मोजणी होत होती. त्यामुळे कोणताही उमेदवार नाराज होत नव्हता. जेव्हापासून बुथनिहाय मतदान मोजले जाऊ लागले, तेव्हापासून प्रत्येक उमेदवारास कोणत्या गावात किती मतदान झाले हे समजू लागले. तरीही कोणत्याही उमेदवाराने, लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली नाही. प्रत्यक्ष उमेदवार जर हिवरेबाजार भेटीला आले, तर ग्रामस्थ त्यांचे श्रीफळ देऊन स्वागत करतात.

हिवरेबाजारच्या विकासात सर्वांनी सहकार्य केलेले आहे. यापूर्वी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती या सर्व निवडणुकांमध्ये कधीही पोलिंग एजंट व बुथ यासारखा आग्रह कोणत्याही पक्षाने या धरला नाही. यामुळेच हिवरेबाजारचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला. सरपंच पोपटराव पवार यांना ‘पद्मश्री’ सन्मान मिळाला, त्या वेळीही विविध पक्षांच्या वतीने यथोचित सन्मान केला, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

प्रेरणा देणारे गाव कायमस्वरूपी राहिले पाहिजे : पोपटराव पवार

हिवरेबाजरचे सरपंच तथा राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी सांगितले, की घरातसुद्धा कोणी कोणाला मतदान करायचे हे सांगत नाही. गावात तर नाहीच. उद्देश एकच- उभे राहिलेले इतरांना प्रेरणा देणारे हिवरेबाजार गाव कायमस्वरूपी राहिले पाहिजे. गेल्या 35 वर्षांनंतर प्रथमच झालेल्या सन 2021च्या हिवरेबाजार निवडणुकीतसुद्धा हीच पद्धत अवलंबली होती. हिवरेबाजार इतरांसाठी विकासाचा प्रेरणास्रोत बनले आहे. भारतीय लोकशाहीची ताकद म्हणजे निवडणूक प्रक्रिया असून लोकांच्या व गावाच्या समस्या सुटल्या पाहिजेत.

हेही वाचा

Back to top button