‘त्या’ मनोरुग्णाला ‘मानवसेवेचा’ आधार! स्पर्धा परीक्षांर्थ्यांकडून माणुसकीचे दर्शन | पुढारी

‘त्या’ मनोरुग्णाला ‘मानवसेवेचा’ आधार! स्पर्धा परीक्षांर्थ्यांकडून माणुसकीचे दर्शन

रोहित टेके

वारी : पायाला भलीमोठी जखम..चालता येत नाही.. तरी जगण्याची प्रचंड इछाशक्ती.. खूप लोक पाहायचे आणि निघून जायचे. परंतु मदतीला कोणी पुढे आले नाही. शेवटी आत्मा मालिक करिअर अकॅडमीचे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी पुढे आले आणि शोध सुरू झाला मनोरुग्णांना सांभाळणार्‍या सामाजिक संस्थेचा.. शेवटी पत्ता गवसलाच.. अहमदनगर तालुक्यातील अरणगाव येथील अमृतवाहिनी ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुंजाळ यांची टीम आली अन् त्या बेवारस मनोरुग्णाला ‘मानवसेवा’ या सेवाभावी संस्थेत अखेर निवारा मिळाला.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात नगर-मनमाड महामार्ग लगत असलेल्या आत्मा मालिक करिअर अकॅडमीमध्ये इतर तालुक्यातील तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. याच परिसरात रस्त्यावर अंदाजे 40 ते 45 वर्षे वय असलेली एक मनोरुग्ण व्यक्ती फिरत असल्याचे या तरुणांच्या निदर्शनास आले. रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका टपरीच्या आडोशाला या व्यक्तीचा निवारा होता.अशातच त्या व्यक्तीच्या पायाला मोठ्या प्रमाणात जखम झालेली होती. त्यामुळे त्याला चालणे ही दुरापास्त झाले होते. मानवतेच्या भावनेतून रणजीत गोसावी हे मदतीसाठी पुढे आले.

एखादी सेवाभावी संस्था शोधून या व्यक्तीचे पुनर्वसन करण्याचा त्यांनी व सहकार्र्‍यांनी निर्धार केला. त्यावर त्यांनी नजीकच्या जिल्ह्यात सोशल मीडियावर प्रचलित असलेल्या अनेक सेवाभावी व्यक्तींना, संस्थांना अनेकदा संपर्क केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी सामाजिक संस्थेत काम करणारा गोसावी यांचा मित्र गणेश पवार याला त्यांनी संपर्क केला. त्याने अरणगाव येथील डॉ. दिलीप गुंजाळ यांच्या ‘मानवसेवा’ या संस्थेचा पत्ता व संपर्क क्रमांक दिला. त्यावर गोसावी यांनी डॉ. गुंजाळ यांच्याशी संपर्क साधून संबंधित व्यक्तीविषयी माहिती दिली.

डॉ. गुंजाळ यांनी समर्थता दर्शविली मात्र त्यासाठी पोलिस ठाण्याचे पत्र द्यावे लागेल. त्यावर गोसावी यांचा जीव भांड्यात पडला खरा.. मात्र पुढे पत्र कसे मिळवायचे असा प्रश्न उभा ठाकला. त्यावर डॉ. गुंजाळ यांनी त्यांना सांगितले. कोपरगावातील स्थानिक पत्रकार रोहित टेके हे माझे मित्र असून आपण त्यांच्याशी संपर्क साधा. ते पत्र मिळवून देण्यासाठी आपल्याला सहकार्य करतील. गोसावी यांनी पत्रकार टेके यांच्याशी संपर्क साधला. त्यावर टेके यांनी कोपरगाव शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्याशी संपर्क साधला आणि वस्तुस्थिती सांगितली. त्यावर निरीक्षक देशमुख यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ पत्र उपलब्ध करून दिले.

संवेदनशील अधिकारी मिळतील!

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हे तरुण एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी आपापसात काही रक्कम जमा करून ‘मानवसेवा’ या संस्थेला देऊ केली. एकंदरीतच स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना एखाद्या बेवारस मनोरुग्णाला निवारा मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार्‍या या तरुणांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. यातूनच भविष्यात मिळालेल्या यशातून संवेदनशील अधिकारी म्हणून हे नक्कीच जनतेची सेवा करतील, असेही कौतुक डॉ. दिलीप गुंजाळ व अंबादास गुंजाळ यांनी केले.

हेही वाचा

Back to top button